Home पश्चिम महाराष्ट्र कोरोना वायरस  पुण्यात विभागीय आयुक्तांनाच पाठविला अफवेचा संदेश…!

कोरोना वायरस  पुण्यात विभागीय आयुक्तांनाच पाठविला अफवेचा संदेश…!

35
0

राजेश भांगे

पुणे , दि. १७ :- कोरेगाव पार्क येथील नामांकित हॉटेलमध्ये ‘कोरोना’चा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्ती असल्याची माहिती एकाने थेट विभागीय आयुक्तांना पाठविली. जिल्हा आणि पोलिस प्रशासनाने तत्काळ तपासणी केली. मात्र, ती माहिती खोटी असल्याचे आढळल्याने अनोळखी मोबाईलधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे खोटी माहिती व अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध यापुढे कडक कारवाई करणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे व पिंपरी – चिंचवडमध्ये जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रशासन व आरोग्य विभागाकडून सर्व पातळ्यांवर खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान, शनिवारी रात्री दहाच्या सुमारास विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीने संदेश पाठविला. त्यात कोरेगाव पार्क परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये कोरोना संसर्ग झालेले रुग्ण राहत आहेत, असा उल्लेख होता.
डॉ. म्हैसेकर यांनी त्या संदेशाची गांभीर्याने दखल घेत प्रशासकीय यंत्रणेला रुग्णांचा शोध घेण्याच्या कामाला लावले. तपासणीत कोरोनाग्रस्त आढळून आले नाहीत. संबंधित संदेश खोटा असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे डॉ. म्हैसेकर यांनीच कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात संबंधित मोबाईलधारकाविरुद्ध फिर्याद दिली. हा संदेश पाठविणाऱ्या व्यक्तीचा कोरेगाव पार्क पोलिस शोध घेत आहेत.
अफवा पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई
व्हॉट्‌सऍप, फेसबुक व अन्य समाजमाध्यमांद्वारे गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाबत अफवा पसरविल्या जात आहेत. दरम्यान, अफवेचा हा संदेश थेट विभागीय आयुक्तांपर्यंत पोचल्यामुळे त्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. यामुळे खोटी माहिती व अफवा पसरविणाऱ्यांच्या बेजबाबदारपणाला आळा बसणार आहे. गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीवर पोलिसांकडून कडक कारवाई केली जाणार आहे.
“कोरेगाव पार्क परिसरातील नामांकित हॉटेलमध्ये कोरोनाची लागण झालेले रुग्ण राहत असल्याचा संदेश अनोळखी व्यक्तीने विभागीय आयुक्तांना पाठविला होता. प्रशासनाने शोध घेतल्यानंतर तो संदेश अफवा पसरविणारा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Unlimited Reseller Hosting