Home पश्चिम महाराष्ट्र शिर्डी साईबाबा दर्शन पुढील आदेश येई पर्यंत बंद

शिर्डी साईबाबा दर्शन पुढील आदेश येई पर्यंत बंद

600

कोरोना विषाणू च्या प्रसार रोखण्यासाठी घेतला निर्णय…!

शिर्डी / मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या तदर्थ समितीच्‍या वतीने कोरोना व्‍हायरसचा प्रसार रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाय म्‍हणून श्री साईबाबा समाधी मंदिर भाविकांना दर्शनाकरीता बंद ठेवण्‍याचा निर्णय घेतला असून मंदिरातील दैनंदिन पूजा-अर्चा नेहमीप्रमाणे सुरु राहतील अशी माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.

यावेळी डोंगरे म्‍हणाले की, जगभरातील काही देशांमध्‍ये कोरोना व्‍हायरसची लागण झालेले रुग्‍ण मोठयाप्रमाणात आढळून आलेले असून सदर व्‍हायरसची लागण झालेले काही रुग्‍ण भारतातही आढळून आलेले आहेत. श्री क्षेत्र शिर्डी हे देशातील नंबर दोनचे देवस्‍थान असून श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनाकरीता देशाच्‍या व जगाच्‍या कानाकोप-यातुन भक्‍त दर्शनाकरीता शिर्डी येथे येत असतात. त्‍यामुळे मंदिर व मंदिर परिसरात भाविकांची मोठी वर्दळ होत असते. कोरोना व्‍हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये म्‍हणून राज्‍य शासनाने मार्गदर्शक सूचना केलेल्‍या आहेत. यामध्‍ये धार्म‍िक स्‍थळे, सामाजिक ठिकाणी गर्दी होऊ नये अथवा करु नये असे निर्देश देण्‍यात आलेले आहे. याच पार्श्‍वभूमीवर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या तदर्थ समितीच्‍या वतीने दि. १७ मार्च २०२० रोजी दुपारी ३.०० वाजेपासुन श्री साईबाबा समाधी मंदिर दर्शनाकरीता साईभक्‍तांना बंद ठेण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला असून समाधी मंदिरातील दैनंदिन पूजा-अर्चा सुरु राहतील यामध्‍ये कुठलाही खंड पडणार नाही. दर गुरुवारी निघणारी श्रींची नित्‍याची पालखी नियमित सुरु राहणार असून पालखीकरीता पुजारी व आवश्‍यक कर्मचारी उपस्थित राहणार आहे.

याबरोबरच या कालावधीत संस्‍थानचे श्री साईप्रसादालय व भक्‍तनिवासस्‍थाने ही बंद ठेवण्‍यात येणार आहे. ऑनलाईनव्‍दारे दर्शन बुकींग केलेल्‍या साईभक्‍तांना दि. १७ मार्च २०२० दुपारी ०३.०० वाजेपर्यंत दर्शनासाठी परवानगी दिली जाणार असून संकेतस्‍थळावरुन ऑनलाईन दर्शन बुकींग बंद करण्‍यात आलेले आहेत. याबाबतची माहिती साईभक्‍तांना ई-मेल, दुरुध्‍वनी व संकेतस्‍थळावरुन देण्‍यात येत आहे. सदर कालावधीत गांवकरी गेट ही बंद ठेवण्‍यात येणार असून हे सर्व नियम शासनाचे पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहेत. तरी साईभक्‍तांनी यांची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.