Home विदर्भ कारंजा शहरात कचरा डेपो प्रश्न चिघळला; भाजपा नगरसेवकांच्या आमरण उपोषणाकडे सर्वांचे लक्ष

कारंजा शहरात कचरा डेपो प्रश्न चिघळला; भाजपा नगरसेवकांच्या आमरण उपोषणाकडे सर्वांचे लक्ष

186

वर्धा  – शहरातील कचरा डेपो हटविण्याच्या मागणीसाठी भाजपा नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी आंदोलन छेडले होते. या आंदोलनादरम्यान आमदार मा. सुमितदादा वानखेडे आणि मा. दादाराव केचे यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले होते. त्यावेळी प्रशासनाकडून दिनांक ३० एप्रिलपर्यंत कचरा हटविण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

मात्र, दिलेल्या मुदतीनंतरही कचरा डेपो हटविण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या कचरा डेपोमुळे परिसरात तीव्र दुर्गंधी, डास-माशांचा प्रादुर्भाव, तसेच आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाचे त्रास, त्वचारोग यांसारख्या समस्या भेडसावत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. तसेच, या डेपोमुळे परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न अधिक गंभीर झाला असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होत आहे.

दरम्यान, भाजपा नगरसेवकांनी इशारा दिला होता की, जर ३० एप्रिलपर्यंत कचरा हटविण्यात आला नाही, तर दिनांक १ मे २०२६ पासून आमरण उपोषण करण्यात येईल. आता मुदत संपूनही कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे, भाजपा नगरसेवक आपला इशारा प्रत्यक्षात आणणार का, याकडे संपूर्ण कारंजा शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने या प्रश्नाकडे लक्ष देऊन कचरा डेपो हटविण्याची कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.