Home जळगाव जन्मदात्या बापाने तीन दिवसाच्या मुलिस मारून टाकले ,

जन्मदात्या बापाने तीन दिवसाच्या मुलिस मारून टाकले ,

257

अमिन शाह

विज्ञानाच्या युगात आजही
मुलगा-मुलगी हा भेदभाव किती टोकाचा असू शकतो, याचा एक थरकाप उडवणारा प्रकार जामनेर तालुक्यातील मोराड येथे समोर आला आहे. चौथ्या वेळीही मुलगीच झाली या रागातून एका निर्दयी पित्याने आपल्या अवघ्या तीन दिवसांच्या चिमुरडीच्या डोक्यात लाकडी पाट मारून तिची हत्या केली. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा लालचंद राठोड (वय २६, रा. मोराड) याला आधीच तीन मुली आहेत. त्याला मुलगा हवा होता, मात्र त्याच्या पत्नीने पुन्हा एका मुलीला जन्म दिला. मुलगा झाला नाही, या वैफल्यातून आणि रागातून कृष्णाने २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास हे अघोरी पाऊल उचलले. त्याने घरातील लाकडी पाटाने अवघ्या तीन दिवसांच्या राधिका नावाच्या बालिकेच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. त्यामुळे त्या निष्पाप बालिकेचा जागीच मृत्यू झाला.
या हृदयद्रावक घटनेची माहिती मिळताच पहूर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली. पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार बाळकृष्ण शिंब्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी पिता कृष्णा राठोड याला २५ डिसेंबर रोजी रात्री ८:५१ वाजता अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे करत आहेत. एका बापानेच आपल्या पोटच्या गोळ्याचा असा क्रूर अंत केल्याने समाजातील ‘मुलगाच हवा’ या मानसिकतेची दाहकता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या घटनेने मोराड परिसरासह जिल्हाभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.