Home यवतमाळ वंचितच्या ‘वेट अँड वॉच’मुळे काँग्रेसची धाकधूक वाढली (यवतमाळच्या राजकीय सारीपाटावरकाँग्रेसच्या दुसऱ्या स्वीकृत...

वंचितच्या ‘वेट अँड वॉच’मुळे काँग्रेसची धाकधूक वाढली (यवतमाळच्या राजकीय सारीपाटावरकाँग्रेसच्या दुसऱ्या स्वीकृत सदस्याचे भिजत घोंगडे)

98

यवतमाळ / हरीश कामारकर

नगर परिषदेच्या रणधुमाळीनंतर आता स्वीकृत सदस्य निवडीच्या निमित्ताने यवतमाळच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. संख्याबळाचे गणित जुळवताना विरोधकांची चांगलीच दमछाक होत असून, विशेषतः काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

काँग्रेसला या निवडणुकीत केवळ १५ जागांवर समाधान मानावे लागल्याने, आपल्या कोट्यातील दुसऱ्या स्वीकृत सदस्याला सभागृहात पाठवण्यासाठी त्यांना आता मित्रपक्षांच्या कुबड्यांची नितांत गरज भासत आहे. या संपूर्ण पेचप्रसंगात वंचित बहुजन आघाडीची भूमिका किंगमेकरची ठरण्याची शक्यता असून, त्यांनी सध्या अवलंबलेल्या ‘वेट अँड वॉच’च्या पवित्र्यामुळे काँग्रेसची झोप उडाली आहे.

काँग्रेसकडून एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याचे नाव पहिल्या जागेसाठी निश्चित मानले जात असून, या पदासाठी संबंधित इच्छुकाने आपली तीव्र इच्छाही पक्षश्रेष्ठींकडे बोलून दाखविली आहे. मात्र, सदर पदाधिकारी हा मूळचा स्थानिक नसल्याने पक्षांतर्गत विरोध नाकारता येत नाही. परंतु विद्यमान आमदाराचा निकटवर्तीय म्हणून त्यांनी ओळख निर्माण केल्याने आमदारांच्या भूमिकेकडे सुद्धा लक्ष लागले आहे. तर दुसऱ्या जागेसाठी आवश्यक असलेला ‘मॅजिक फिगर’ गाठताना काँग्रेसच्या नाकी नऊ येत आहेत. सद्यस्थितीत विरोधकांकडे काँग्रेसचे १५, शिंदे सेनेचे ७, वंचितचे ३ आणि एमआयएमचा १ असे विखुरलेले संख्याबळ आहे. हे संख्याबळ एकवटल्याशिवाय काँग्रेसचा दुसरा सदस्य निवडून येणे तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने वंचितच्या नेत्यांशी संपर्क साधून मदतीची याचना केली आहे, मात्र वंचितने अद्याप आपले पत्ते उघड केलेले नाहीत.
दुसरीकडे, या राजकीय महाभारतात समीकरणांची वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. जर वंचित बहुजन आघाडीने आपला पाठिंबा काँग्रेसऐवजी शिंदे सेनेच्या पारड्यात टाकला, तर सत्तेच्या सारीपाटावर मोठी उलथापालथ होऊ शकते. अशा स्थितीत पालकमंत्र्यांच्या अत्यंत निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या आणि महाभारतातील धृतराष्ट्राचे सारथ्य करणाऱ्या पात्राचे नाव धारण करणाऱ्या ‘संजय’ यांना स्वीकृत सदस्यपदाची लॉटरी लागण्याची दाट शक्यता आहे. सत्ताधारी भाजपने आधीच २९ संख्याबळासह अपक्षांची मोट बांधून आपली स्थिती भक्कम केली असताना, विरोधकांमधील ही अंतर्गत ओढाताण कुणाच्या पथ्यावर पडणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. सध्या तरी वंचितच्या तटस्थतेमुळे काँग्रेसचे हे ‘भिजत घोंगडे’ कायम असून, फोडाफोडीच्या राजकारणाची टांगती तलवार कायम आहे.

….. Box….

निवडणुकीच्या काळात काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून माधुरी मडावी यांचे नाव चर्चेत होते, मात्र मतदार यादीत नाव नसल्याच्या तांत्रिक कारणामुळे त्यांची उमेदवारी बाद झाली होती. असे असूनही, काँग्रेसने त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा प्रचारात करून घेतला आणि त्यांना स्वीकृत सदस्यपदाचे आश्वासन देऊन सक्रिय ठेवले. मात्र, आता तांत्रिक अडचण अशी आहे की, स्वीकृत सदस्य होण्यासाठी संबंधित व्यक्ती त्या शहराचा स्थानिक रहिवासी असणे अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत, मूळच्या बाहेरगावच्या असलेल्या आणि मडावींना दिलेल्या या आश्वासनाचे काँग्रेस काय करणार, असा सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

Box….

पक्षादेशाप्रमाणेच भूमिका घेणार – डॉ. निरज वाघमारे ( गटनेता – वंचित बहुजन आघाडी)
नगर परिषदेच्या दुसऱ्या स्वीकृत सदस्यावरून निर्माण झालेला पेच आता अधिक गडद झाला आहे. काँग्रेसला या जागेसाठी वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्याची नितांत गरज असताना, वंचितचे गटनेते डॉ. निरज वाघमारे यांनी “जो पक्ष आदेश देईल, त्यांच्या सोबत आम्ही जाऊ,” असे म्हणत चेंडू थेट वरिष्ठ नेतृत्वाच्या कोर्टात टाकला आहे. यामुळे काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.