Home जळगाव वादग्रस्त पोलीस निरीक्षक संदीप पाटील निलंबित!!

वादग्रस्त पोलीस निरीक्षक संदीप पाटील निलंबित!!

661

 

अमिन शाह

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर एका महिलेसोबत लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होऊनही गुन्हा दाखल होऊ न शकल्याने खळबळ उडाली होती. मात्र, या प्रकरणाची गंभीर दखल घेत विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. यासोबतच खात्या अंतर्गत प्राथमिक चौकशीचे आदेशही दिले आहेत.

*पीडित महिलेच्या संभाषणाची कॉल रेकॉर्डिंग सभागृहात*

29 ऑगस्ट रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर गंभीर आरोप करताना, त्यांच्या आणि पीडित महिलेच्या संभाषणाची कॉल रेकॉर्डिंग सभागृहात ऐकवले. या रेकॉर्डिंगमध्ये संदीप पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि आमदारांनाही धमक्या दिल्याचा उल्लेख असल्याने खळबळ उडाली होती.

प्राथमिक टप्प्यात महिलेने तक्रार दाखल करण्यास नकार दिल्याने गुन्हा नोंदवला जाऊ शकला नव्हता. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी यावर सखोल चौकशी करून सविस्तर अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याकडे सादर केला. यानंतर कारवाई करत पाटील यांचे निलंबन जाहीर करण्यात आले आहे.

*लोकप्रतिनिधीला धमकी*

आरोपानुसार, संदीप पाटील यांनी 2023 मध्ये एका गुन्ह्याच्या प्रकरणात संबंधित महिलेची मदत करून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत वेगवेगळ्या ठिकाणी नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा आमदार चव्हाण यांनी केला. महिलेला याविषयी तक्रार देण्याचा विचार करताच, संदीप पाटील यांनी “मी एसपी, आयजी, डीजी यांना घाबरत नाही. पालकमंत्री माझ्या खिशात आहेत. आमदाराकडे गेलीस तर त्यांनाही गोळ्या घालून मारीन,” अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.

*अधिकारीच लोकप्रतिनिधींना धमकावत असतील, तर जनतेचे काय?*

या संपूर्ण प्रकारामुळे पोलीस दलातील नैतिकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आमदार चव्हाण यांनी “एक पोलीस अधिकारी जर लोकप्रतिनिधींनाच गोळ्या घालण्याची भाषा करत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांचे काय? असा रोषपूर्ण सवाल उपस्थित करत कठोर कारवाईची मागणी केली होती.

*खातेअंतर्गत चौकशीला सुरुवात*

निलंबनानंतर आता या प्रकरणाची खात्या अंतर्गत चौकशी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

या प्रकरणाने पोलीस खात्याच्या प्रतिमेवर मोठा आघात झाला असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याप्रकरणात शिस्तभंगाच्या दृष्टीने कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.