
बीड जिल्ह्यातील वडवणी केज शहरात ‘बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’ची शाखा कायमची बंद होणार असल्याची एक अफवा वाऱ्यासारखी पसरली आणि पाहता पाहता संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या अफवेमुळे आपले पैसे आणि सोने सुरक्षित राहावे या उद्देशाने खातेदारांनी बँकेसमोर तोबा गर्दी केली होती. परिस्थिती इतकी गंभीर होती की, पहाटेपर्यंत नागरिक रांगेत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून वडवणी परिसरात बुलढाणा अर्बन बँक डबघाईला आली असून शाखा बंद होणार आहे, अशी चर्चा सुरू झाली. या एका अफवेने खातेदारांमध्ये घबराट पसरवली. काल सायंकाळपासूनच खातेदारांनी बँकेकडे धाव घेण्यास सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत गर्दी वाढतच गेली आणि पहाटेपर्यंत नागरिक बँकेबाहेर ठाण मांडून बसले होते. गर्दी वाढल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. खातेदारांनी केवळ पैसे काढण्यासाठीच नव्हे, तर तारण ठेवलेले सोने सोडवून घेण्यासाठीही मोठी गर्दी केली होती.
पूर्वी जिल्ह्यातील अनेक बँका बुडाल्याची भीती
बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांत ज्ञानराधा मल्टीस्टेट सह अनेक पतसंस्था आणि मल्टीस्टेट बँकांनी खातेदारांचे कोट्यवधी रुपये बुडवून गाशा गुंडाळला आहे. या कटू अनुभवांमुळे सामान्य नागरिक आधीच धास्तावलेले आहेत. याच भीतीचा फायदा अफवा पसरवणाऱ्यांनी घेतला, ज्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अधिकृत माहितीची वाट न पाहता बँकेकडे धाव घेतली.
बँक सुरक्षित अफवेचे केले खंडन
बुलढाणा अर्बन बँकेने या सर्व अफवांचे खंडन केले आहे. बँकेने स्पष्ट केले आहे की बीड जिल्ह्यात बँकेच्या एकूण १३ शाखा असून इतर सर्व ठिकाणी व्यवहार सुरळीत सुरू आहेत. केवळ वडवणी शाखेबाबत जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवण्यात आली आहे. बँकेची आर्थिक स्थिती मजबूत असून खातेदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित आहेत. अचानक वाढलेल्या व्यवहारामुळे बँक कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण आला होता, तरीही ग्राहकांना सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था म्हणून या बँकेची ओळख आहे. सूक्ष्म वित्तपुरवठा आणि सामाजिक उपक्रमांत ही संस्था नेहमीच आघाडीवर राहिली आहे. बँक प्रशासन आणि व्यवस्थापनाने खातेदारांना आवाहन केले आहे की, कोणत्याही चुकीच्या किंवा अपुऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नका. बँकेचे व्यवहार पारदर्शक आणि सुरक्षित आहेत.











































