
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा गंभीर प्रकार
दोन अल्पवयीन आरोपींविरोधात पोक्सो दाखल
दुसरबीड प्रतिनिधी गुलशेर शेख
दि.२६ डिसेंबर
सिंदखेड राजा तालुक्यातील एका गावात एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून या प्रकरणी किनगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी अप क्रमांक ३५४/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ६४(२)(i), ६५(२), ३५१(३), ३(५) तसेच पोक्सो कायदा कलम ४, ६ व १७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरी एकटी असताना शेजारी राहणारे ओम (वय १४ वर्षे) व कृष्णा (वय १५ वर्षे) हे घरात आले. यावेळी एकाने घराबाहेर पहारा दिला, तर दुसऱ्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.घटनेनंतर पीडितेला शारीरिक वेदना जाणवू लागल्याने हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास आला. त्यानंतर दि.२४ डिसेंबर रोजी रात्री११ वाजता किनगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मातोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आवश्यक ती वैद्यकीय तपासणी, बाल न्याय प्रक्रियेनुसार कारवाई व पुढील तपास सुरू आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.











































