
पति सह तिघांना अटक
अमिन शाह
बुलडाणा ,
मेहकर तालुक्यातील जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीतील आदिवासी बहुल माळेगाव येथे मंगळवारी सकाळी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 21 वर्षीय गर्भवती नवविवाहितीने सासरच्या जाचाला कंटाळून विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. यानंतर, मृतक विवाहितेच्या माहेरकडील संतप्त मंडळीने आरोपी अटक करा, तेव्हाच मृतदेह ताब्यात घेवू असा पवित्रा घेतला होता. दरम्यान, पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरविली आणि तिन्ही आरोपींना अटक केली.
जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम माळेगाव येथील साधना विष्णू चोडकर (21 वर्ष) या महिलेचा विवाह हा 2024 मध्ये झाला होता. 23 डिसेंबरच्या सकाळी महिलेने गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत आत्महत्या केल्याची माहिती जानेफळ पोलीस स्टेशनला पोलीस पाटील यांनी दिली. तेव्हा, पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. घटनेची माहिती मिळतात मृतक महिलेचे माहेर असलेल्या वाकदवाडी (ता. मालेगाव जि. वाशिम) येथील नातेवाईकांनी माळेगाव गाठले. “मुलीला सासरच्या लोकांचा खूप त्रास होता; या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली, असे सांगत जोपर्यंत सासू-सासरे व पती अशा तिन्ही आरोपींना अटक करण्यात येत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा संतप्त पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी तत्परता दाखवत सासू-सासरे यांना अटक केली. तर पती विष्णू रामाभाऊ चोडकर याला ‘मोबाईल लोकेशन’ च्या आधारावर नगर येथून अटक करण्यात आली. त्यानंतर दुपारी 4 वाजता मुलीच्या माहेरील मंडळींनी मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी सुद्धा माळेगाव येथे भेट दिली.
व्हिडोओ कॉलद्वारे अटकेची खात्री
कौटुंबिक अत्याचार सहन न झाल्याने आत्महत्या केली. माहेरहून पैसे आणण्याचा तगादा माहेरच्या लोकांनी लावला होता, असे तक्रारीत नमूद आहे. यावरून पोलिसांनी पतीसह मृतक महिलेच्या सासूसासऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. व्हिडीओ कॉलद्वारे पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपींना अटक झाल्याची खात्री नातेवाईकांना दिली. त्यानंतर, नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्चेदनासाठी मेहकर येथे पाठविण्यात आला होता.











































