Home विदर्भ कारंजा घाडगेत राजकीय रस्सीखेच तीव्र; जय बेलखेडे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

कारंजा घाडगेत राजकीय रस्सीखेच तीव्र; जय बेलखेडे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

670

कारंजा घाडगे (जि. वर्धा) – येथील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले असून आगामी नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. विशेषतः स्थानिक पातळीवर प्रभावी मानले जाणारे नेते जय बेलखेडे आणि त्यांचे समर्थक यांच्या हालचालींमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

मागील विधानसभा निवडणुकीत आपली दांडर कामगिरीने जय बेलखेडे हे कारंजा परिसरात एक मजबूत नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे आणि स्थानिक पातळीवरील जनसंपर्कामुळे त्यांचा मतदारांमध्ये चांगला प्रभाव आहे. त्यामुळेच येणाऱ्या नगर पंचायत निवडणुकीत त्यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

दरम्यान, जय बेलखेडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बचू कडू यांनी अलीकडेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकीय चर्चांना अधिक उधाण आले आहे. कडू यांच्या या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर नवे राजकीय समीकरण तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाला कारंजा परिसरात बळ मिळणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

नगर पंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी कोणाला मिळणार, हा सध्या सर्वात मोठा प्रश्न ठरला आहे. विविध पक्षांकडून इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून प्रत्येकजण आपापल्या परीने पक्षश्रेष्ठींवर दबाव टाकताना दिसत आहे.

स्थानिक नागरिकांमध्येही या घडामोडींविषयी उत्सुकता वाढली आहे. विकासकामे, पाणीपुरवठा, रस्त्यांची स्थिती, तसेच मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर निवडणूक लढवली जाणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, सध्याच्या घडीला पक्षांतर आणि गटबाजी यामुळे राजकीय वातावरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे.

एकूणच, कारंजा घाडगे येथे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून पुढील काही दिवसांत आणखी मोठे निर्णय आणि घडामोडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जय बेलखेडे आणि त्यांच्या समर्थकांची पुढील चाल काय असेल, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.