Home जळगाव मिस्त्री काम करत पूर्ण केले स्वप्न; फैजपूरच्या अझर शेखची मुंबई पोलीस दलात...

मिस्त्री काम करत पूर्ण केले स्वप्न; फैजपूरच्या अझर शेखची मुंबई पोलीस दलात निवड!

33

 

फैजपूर प्रतिनिधी :

अत्यंत गरीब परिस्थितीत जीवन जगत असताना जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर फैजपूर येथील अझर शेख याने मुंबई पोलीस दलात निवड होऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याच्या या यशामुळे संपूर्ण परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अझर शेख यांचा परिवार एका छोट्याशा 10 बाय 12 च्या खोलीत राहत होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांचे वडील बाबू ड्रायव्हर (ट्रक चालक) म्हणून रात्रंदिवस कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. घरातील परिस्थिती पाहून अझरनेही लहानपणापासूनच जबाबदारी स्वीकारली.
शिक्षण सुरू ठेवत असतानाच त्याने मिस्त्री काम करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावला. दिवसभर कष्टाचे काम आणि रात्री अभ्यास व पोलीस भरतीची तयारी, असा त्याचा संघर्ष सुरू होता. अनेक अडचणी, आर्थिक संकटे आणि मर्यादित साधने असूनही त्याने आपले ध्येय सोडले नाही.
मुंबई पोलीस भरतीच्या शेवटच्या वर्षात अझरने अधिक मेहनत घेतली आणि अखेर आपल्या जिद्दीच्या बळावर मुंबई पोलीस दलात निवड मिळवली. त्याच्या या यशामुळे कुटुंबाचा संघर्ष सार्थकी लागला असून परिसरातील युवकांसाठी तो प्रेरणादायी आदर्श ठरला आहे.
“परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वास यांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते,” हे अझर शेख यांच्या यशाने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.
अझर शेख यांच्या या यशाबद्दल मित्रपरिवार, नातेवाईक, शिक्षक तसेच फैजपूर परिसरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.