Home यवतमाळ रोजगार विभागावर तीव्र नाराजी; “मजुरी नाही, मस्टर नाही… आता जगायचं कसं?”

रोजगार विभागावर तीव्र नाराजी; “मजुरी नाही, मस्टर नाही… आता जगायचं कसं?”

74
लोही ग्रामसभेत शेतकऱ्यांचा संताप; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा
 दारव्हा / लोही  ( प्रतिनिधी ) – लोही ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत रोजगार हमी योजनेतील कथित भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांची उदासीनता आणि रोजगार सेवकांच्या मनमानीविरोधात लाभार्थी शेतकरी व ग्रामस्थांचा संताप उसळला. “मजुरी नाही, मस्टर नाही, आणि आता काम पूर्ण नाही केले तर पैसेही नाही,” असा आरोप करत ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकारी, सरपंच आणि पंचायत समिती प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
ग्रामसभा ही गावकऱ्यांच्या समस्या मांडून त्यावर तोडगा काढण्यासाठी असते. मात्र संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी ग्रामसभेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. अनेक वेळा समस्या मांडूनही जबाबदार अधिकारी उपस्थित राहत नसल्याने ग्रामसभा केवळ औपचारिकता ठरत असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली.
रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर सिंचन विहिरींचे खोदकाम पूर्ण करूनही अनेक गरीब शेतकऱ्यांना आजपर्यंत मजुरीचे मस्टर मिळाले नसल्याचा आरोप ग्रामसभेत करण्यात आला. काही लाभार्थ्यांनी व्याजाने पैसे उचलून विहिरींचे काम पूर्ण केले, मात्र तब्बल तीन वर्षे उलटूनही शासनाकडून एक रुपयाही मिळाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
यावेळी रोजगार सेवकांकडून “15 जूनपूर्वी बांधकाम पूर्ण करा, अन्यथा पैसे मिळणार नाहीत,” असा दबाव टाकला जात असल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला. “खोदकामाचे पैसेच मिळाले नाहीत, तर पुढील बांधकाम करायचे कसे?” असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
काही शेतकऱ्यांनी पंचायत समिती प्रशासन आणि रोजगार सेवकांच्या निष्काळजीपणामुळेच शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप केला. “कागदपत्रे वेळेवर भरली नाहीत, मस्टर काढले नाहीत, कामाची नोंद केली नाही आणि आता दोष मात्र आमच्यावर टाकला जात आहे,” अशी भावना ग्रामसभेत व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, केंद्र सरकारकडून मनरेगा अंतर्गत बदल करून ‘विकसित भारत – रोजगार आणि उपजीविका मिशन (ग्रामीण)’ हा नवीन कायदा लागू होणार असल्याच्या चर्चेमुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “31 मेनंतर योजना बंद झाली तर आमचे थकीत पैसे कोण देणार?” असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.
काही दिवसांपूर्वी लाभार्थी शेतकरी बीडीओ अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांना केवळ आश्वासन देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला. संतप्त शेतकऱ्यांनी इशारा दिला की, “आमची थकीत बिले तातडीने मिळाली नाहीत, तर आम्हाला आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घ्यावा लागू शकतो.”
लोही ग्रामसभेत व्यक्त झालेला हा संताप पाहता परिसरात प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी पसरली असून, आता तरी संबंधित अधिकारी जागे होणार का, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
Previous articleपोहायला गेलेल्या पिता -पुत्राचा विहिरीत मृत्यू….
editor
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.