Home पश्चिम महाराष्ट्र संजय चुनारकर यांचा जाहीर सत्कार, शिर्डीत राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अधिवेशन...

संजय चुनारकर यांचा जाहीर सत्कार, शिर्डीत राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात

106
शिर्डी  – राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने रविवार, दिनांक १ मार्च २०२६ रोजी शिर्डी येथील साई पालखी निवारा, मनमाड महामार्ग येथे राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात पार पडले. सकाळी ९.३० ते दुपारी ४.३० या वेळेत झालेल्या या अधिवेशनाला देशभरातील पत्रकार, संघटनेचे पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. संतोष निकम होते. उद्घाटक म्हणून राष्ट्रीय महासचिव रमेश दांडे तसेच राष्ट्रीय अध्यक्ष (महिला परिषद) सुजाता गुरु उपस्थित होत्या. स्वागताध्यक्ष म्हणून प्रदेश अध्यक्ष वैभव पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
या अधिवेशनात राज्य सल्लागार, न.पा. व मनपा शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य म्हणून कार्यरत असलेले संजय चुनारकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून सातत्याने कार्य केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. विविध सामाजिक उपक्रम, शिक्षक संघटनांमधील सक्रिय भूमिका आणि जनहिताच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेतल्यामुळे त्यांना हा गौरव प्रदान करण्यात आला.
सत्कार स्वीकारताना संजय चुनारकर म्हणाले, “हा सन्मान माझा वैयक्तिक नसून शिक्षक बांधवांचा आणि सामाजिक कार्यात सहभागी असलेल्या सर्व सहकाऱ्यांचा आहे. पत्रकार संघटनेने केलेला हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. शिक्षण, सामाजिक जागरूकता आणि संघटनात्मक बळकटी यासाठी पुढेही प्रामाणिकपणे काम करत राहीन. समाजातील वंचित घटकांसाठी आवाज उठवणे आणि शिक्षकांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडणे हीच माझी बांधिलकी राहील.”
अधिवेशनात पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. संघटनेच्या भविष्यातील वाटचालीसंदर्भातही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. आयोजनाची जबाबदारी प्रफुल्ल मेत्राम, संपर्क प्रमुख (महाराष्ट्र प्रदेश) यांनी सांभाळली.
राष्ट्रीय स्तरावरील या अधिवेशनामुळे पत्रकार व विविध सामाजिक संघटनांमध्ये समन्वय वाढण्यास आणि सार्वजनिक प्रश्नांवर प्रभावी भूमिका मांडण्यास दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.