Home नागपूर अविनाश पाठक लिखित हितगुज या पुस्तकाची पद्मगंधा प्रतिष्ठानच्या पुरस्कारासाठी निवड

अविनाश पाठक लिखित हितगुज या पुस्तकाची पद्मगंधा प्रतिष्ठानच्या पुरस्कारासाठी निवड

124

 

नागपूर १० फेब्रुवारी..
पद्मगंधा प्रतिष्ठान, नागपूर या साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेतर्फे आयोजित वर्ष २०२०-२१चे राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङमय पुरस्कार जाहीर झाले असून ललित लेखनासाठी देण्यात येणारा स्व.विमलताई देशमुख स्मृती उत्कृष्ट ललित लेखन पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार, स्तंभलेखक आणि साहित्यिक अविनाश पाठक लिखित हितगुज या ललित लेखसंग्रहाला जाहीर झाला आहे. रोख रक्कम व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे…

मुंबईच्या भरारी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या हितगुज या ललित लेखसंग्रहात अविनाश पाठक यांनी पुण्याच्या चिंतन आदेश या पाक्षिकात चालवलेल्या थोडं पुणेरी..थोडं नागपुरी.. या ललित स्तंभात लिहिलेल्या ४२ लेखांचा समावेश करण्यात आला आहे. हे अविनाश पाठक यांचे प्रकाशित झालेले १४ वे पुस्तक आहे.या पुस्तकाला ख्यातनाम साहित्यिक शुभांगी भडभडे यांची प्रस्तावना लाभली असून अविनाश पाठक यांनी त्यांच्या समवेत १९७०साली नागपूरच्या हडस हायस्कुलमध्ये शिकलेल्या सर्व मित्र मैत्रिणींना अर्पण केले आहे..

अविनाश पाठक यांची आतापर्यंत १४ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यात डावपेच आणि सत्तेच्या सावलीत हे दोन राजकीय कथासंग्रह, पूर्णांक सुखाचा ही कादंबरी, मराठी वाङमय व्यवहार- चिंतन आणि चिंता हे संपादित पुस्तक, काळ्या कोळशाची काळी कहाणी हे कोळसा घोटाळ्यावरील पुस्तक, गाभाऱ्यातला कवडसा, माझ्या खिडकीतले आकाश, आठवणीतले नेते, थोडं आंबट थोडं गोड आणि हितगुज हे ललित लेख संग्रह तसेच दाहक वास्तव, कालप्रवाहाच्या वळणांवरुन, मागोवा घटितांचा आणि दृष्टीक्षेप हे वैचारिक लेख संग्रह यांचा समावेश आहे. यातील मराठी वाङमय व्यवहार-चिंतन आणि चिंता, पूर्णांक सुखाचा, डावपेच, आठवणीतले नेते आणि दृष्टीक्षेप या पुस्तकांना विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे…

गत ४५ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय असलेल्या अविनाश पाठक यांनी दृकश्राव्य,मुद्रित, वेब आणि समाज माध्यमातून पत्रकारिता केली आहे. विविध मराठी वृत्तपत्रांमध्ये त्यांनी विपुल लेखन केले असून पत्रकारितेतील विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. रामटेकच्या गडावरुन या दिवाळी अंकाचे त्यांनी आठ वर्ष यशस्वी संपादन केले आहे.सध्या अविनाश पाठक पंचनामा या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलचे मुख्य संपादक म्हणून कार्यरत असून विविध वृत्तपत्रांत लेखन करीत आहेत..

पद्मगंधा प्रतिष्ठानचा हा पुरस्कार येत्या २७ फेब्रुवारी रोजी आभासी पद्धतीने आयोजित एका कार्यक्रमात प्रदान केला जाणार आहे…