Home विदर्भ सिमेंट कंपनीमुळे भविष्यात वाढणार प्रदूषण, आरोग्याला धोक्याची घंटी , “बेरोजगार युवकाकडे शिक्षण...

सिमेंट कंपनीमुळे भविष्यात वाढणार प्रदूषण, आरोग्याला धोक्याची घंटी , “बेरोजगार युवकाकडे शिक्षण आहे, परंतु रोजगार नाही”

467

बेरोजगार युवक सिमेंट प्रकल्पच्या विरोधात…!

रफीक कनोजे

मुकूटबन ( जि. यवतमाळ ) : – झरी जामणी तालुक्यातील मुकूटबन येथे तीन वर्षापासून सिमेंट कंपनीचे युद्ध स्तरावर काम सुरू आहेत. परंतु स्थानिकांना कामावर घेण्यापासून वंचित ठेवल्या जात आहे. सिमेंट कंपनीत काम करण्याकरीता हवे तेवढे शिक्षण युवकाकडे आहे परंतु स्थानिकांना कामावर घेण्यास कंपनी डावलत आहे. या कंपनीत स्थानिक बेरोजगारांना नोकऱ्या तर मिळाल्याचं नाही परंतु भविष्यात या कंपनीच्या सिमेंट उत्पादनामुळे वायू प्रदूषण वाढणार त्यामुळे श्वसनाचे विकार वाढून अकाली मृत्यूचे प्रमाण वाढणार आहे त्यामुळे स्थानिक नागरिक व बेरोजगार युवक सिमेंट प्रकल्पाच्या विरोधात आहे.

झरी जामणी आदिवासी बहुल व मागास समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील मुकूटबन ग्रामपंचायतीने नाहरकत प्रमाण पत्र देताना शहरातील बेरोजगार आणि पाहिजे त्याला रोजगार, शहराच सौन्दर्यीकरण या बाबीच आश्वासन दिले गेले. मागील काही दिवसात प्रकल्पात रोजगार भरतीसाठी पडताळणी केली असता कंपनीमध्ये शहरातील स्थानिक तरुण बेरोजगारांना हाताला काम लागत नसल्याच्या प्रतिक्रिया आल्या. दहा वर्षापासून येथील स्थानिक बेरोजगारांना मोठी आशा लागली होती की सिमेंट कंपनीत प्रत्येक तरुणांच्या हाताला मागेल तेवढा रोजगार मिळेल. परंतु काही मूठभर लोकांना हाताशी घेऊन हजारो तरुणांच्या हातात तुरी देण्याचं काम या कंपनीने केलं आहे. लोकप्रतिनिधी सुध्दा या बाबीकडे लक्ष देत नाही. त्यामुळे फक्त आजार, रोगराई, प्रदूषण देण्यापेक्षा एकदा बंदच असणे स्थानिकांच्या तोंडात बसले आहे.

परप्रांतीयांचा भरणा – मुकूटबनात परप्रांतीयांचा एक प्रकारे अड्डाच बनला आहे. मुकूटबन शहरात परप्रांतीयांचे जत्थे उतरताना दिसते. यामुळे मुकूटबनची संख्या झपाट्याने वाढत असून शहरात गुन्हेगारी वाढत चालली आहे. शहरात जागा कमी आणि लोकसंख्या वाढत असून याचा नाहक त्रास स्थानीक राहणाऱ्या नागरिकांना होत आहे. प्रकल्पामध्ये परप्रांतीयांचे धागेदोरे ठेकेदार सोबत अगदी जवळचे असल्याने स्थानिक तरुणांचा रोजगार कमी होत असल्याचे स्थानीक तरुणांचे म्हणणे आहे.

सिमेंट कंपनीचे अच्छे दिन व तरूणांचे बूरे दिन – दर वर्षी हजारो तरूण मोठ मोठी प्रवेश फी देऊन इंजिनीअर व आयटी आयच्या पदव्या प्राप्त करून नोकरीच्या आशेने बाहेर पडतात. मात्र प्रत्येक ठिकाणी नो व्हेकन्सीचा बोर्ड पाहून निराशा पदरी पडत आहे. कंपन्या नोकऱ्या देत नाही, शासनाचे याकडे लक्ष नाही. तरूणांना स्वाभिमानाने जगता यावे या साठी सिमेंट कंपनीत मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध करून देऊ, अच्छे दिन आने वाले है, असे नाना आश्वासनाची खैरात वाटली गेली. मात्र आता कंपनीचे अच्छे दिंन व तरूणांचे बूरे दिन आल्याचे प्रतित होत आहे.

कार्बन डाय ऑक्साईड मुळे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम – मुकूटबन शहरात 2022-23 मध्ये नवीन सिमेंट प्रकल्पाचे कार्य पूर्णत्वास होणार आहे. सिमेंट तयार करण्यासाठी लाइमस्टोन वापरला जाणार. लाइमस्टोन भट्टीमध्ये 1400 डिग्री सेल्सिअस तपमानावर गरम केल्या जातो. लाइमस्टोन मधील कार्बन ऑक्सिजनमध्ये मिसळल्यावर कार्बन डाय ऑक्साईड म्हणून बाहेर येतो. संशोधनानुसार, एक टन सिमेंट तयार करण्यासाठी सुमारे अर्धा टन कार्बन डाय ऑक्साईड तयार होतो. मुकुटबनमध्ये सिमेंट कंपनी कार्यरत होईल, त्यानंतर दररोज हजारो टन सिमेंट उत्पादन होईल. ज्यामुळे हजारो टन कार्बन डाय ऑक्साईड वातावरणात मिसळून कार्बनडाय ऑक्साईडच्या वाढत्या प्रमाणामुळे वातावरणातील तापमान वाढेल व त्याचा परिणाम हवामानावर तसेच पावसावर होईल. मानवाच्या बाबतीत प्रमुख रोग हे श्वसन संस्थेवर आणि फुफ्फूसावर परिणाम पडेल. त्यामुळे दमा, क्रॅन्सर, बेशुध्द पडणे, घसा खवखवणे, डोळयातुन पाणी येणे इ. विकार होणार. वनस्पतींच्या बाबतीत त्यांची वाढ खुटंणे, पाने वाळणे, वाकणे, झाड मरून जाणे, उत्पन्न कमी होणे इत्यादी परिणाम होतात. हवा प्रदूषणामुळे इमारतीचे नुकसान होणे, रंग बदलणे, वस्तुंची शक्ती कमी होणे, त्यांचे आयुष्य घटणे इत्यादी गोष्टी घडू शकतात.