Home महाराष्ट्र कंत्राटी, तात्पुरत्या कामगारांचे वेतन कापू नका मुख्यमंत्री व कामगार विभागाचे आस्थापनांना आवाहन

कंत्राटी, तात्पुरत्या कामगारांचे वेतन कापू नका मुख्यमंत्री व कामगार विभागाचे आस्थापनांना आवाहन

80
0

राजेश भांगे

मुंबई , दि. २१ :- कोरोनाच्या संकटाचा सर्वांनी मिळून मुकाबला करायचा आहे. या रोगाचे संक्रमण पूर्णत: थांबविण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी लोकांनी मोठ्या संख्येने येऊ नये, घरीच राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या काळात कामगार व कर्मचाऱ्यांना आर्थिक फटका बसू नये यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सर्व कारखानदार आणि व व्यावसायिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन कामगार विभागाने केले आहे.
यासंदर्भात कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी राज्यातील सर्व कामगार उपायुक्त, सहायक आयुक्त, कामगार अधिकारी यांना त्यांच्या अखत्यारीतील माथाडींसह सर्व खासगी व सार्वजनिक आस्थापनांनी कोणत्याही तात्पुरत्या किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यास नोकरीवरून काढून टाकू नये किंवा त्यांच्या वेतनात कपात करू नये, अशा स्वरूपाच्या सूचना दिल्या आहेत.
सर्व आस्थापनांनी, कंपन्यांनी या आव्हानात्मक परिस्थितीत शासनास सहकार्य करावे तसेच एखाद्या कर्मचाऱ्याने या कालावधीत रजा घेतली असल्यास त्याचे वेतन कापू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

एखाद्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असल्यास ते ठिकाण बंद करावे लागेल अशा परिस्थितीत तेथील कामगार व कर्मचारी कामावर आहेत असेच समजण्यात यावे. या स्थितीत एखाद्यास कामावरून कमी केले तर ती व्यक्ती आणि त्याचा परिवार एवढ्यावरच आर्थिक परिणाम होणार नाहीत तर एकूणच या साथ रोगाविरुद्ध लढण्यामध्ये त्याचे मनोधैर्य खचू शकते आणि याचा व्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असेही डॉ कल्याणकर यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.