Home महत्वाची बातमी दहावीत शिकणाऱ्या मुलाने जन्मदात्या बापास मारून त्याचे प्रेत घरातच गाडून टाकले

दहावीत शिकणाऱ्या मुलाने जन्मदात्या बापास मारून त्याचे प्रेत घरातच गाडून टाकले

150

खळबळजनक घटना….

अमीन शाह

औरंगाबाद , दि. ०१ :- कन्नड तालुक्यातील जामडी घाट येथील इयत्ता १० वीत शिकणाऱ्या मुलानेच जन्मदात्याचा खून करून घरात मृतदेह पुरुन ठेवल्याची घटना उघड़कीस आली आहे. याप्रकरणी कन्नड ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तालुक्यातील जामडी घाट येथील नामदेव चव्हाण व किसन चव्हाण या भावांचे त्यांच्या समाजात आणि परिसरात मोठे प्रस्थ होते. अंदाजे १६-१७ वर्षांपुर्वी नामदेव यांचा विवाह लताबाई यांच्याशी झाला होता. त्यांना एक मुलगा असून त्याचे नाव रितेश आहे. तो सध्या १० वीत शिकत आहे. नामदेव यांना दारूचे व्यसन होते. त्यामुळे घरात वाद होत होता.
नामदेव चव्हाण (४७ वर्षे) हे गेल्या दोन अडीच महिन्यापासून बेपत्ता असल्याची तक्रार पत्नी लताबाई नामदेव चव्हाण यांनी कन्नड ग्रामिण पोलिसांत दिनांक ११ फेब्रूवारी रोजी दिली होती. तर यामुळे भाऊ किसन चव्हाण हे बेचैन होते. आलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तसेच भाऊ किसन यांनी ही घरातच काही घातपात झाला आहे का? हे पाहण्यासाठी मयत नामदेव यांची पत्नी लताबाई व मुलगा रितेश यांच्याकडे विश्वासात घेत विचारपूस केली. त्यावेळी मुलानेच आपल्या जन्मदात्या बापाचा खून करून घरातच मृतदेह पुरुन ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली.

यावेळी मुलगा रितेशने, २२ डिसेंबर रोजी रात्रीच्या वेळी वडील नामदेव ही आले. ते दारू पिऊन आले होते. त्यामुळे त्यांच्यात आणि रितेश याच्यात जोरदार भांडण झाले. त्यावेळी वडिलांनी आपल्यावर कुर्‍हाडीने घाव घालण्याचा प्रयत्न केला. पण तो वार आपण चुकविला. तसेच स्वसंरक्षणसाठी आपण हातात काठीही घेतली. स्वसंरक्षणसाठी उचलेली काठी वडिलांच्या मानेवर बसल्याने ते खाली कोसळले आणि बेशुद्ध झाले. त्यावेळी घाबरल्याने दोराने घरीच त्यांना फाशी दिली आणि प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी घरातच खड्डा काढून पुरले. तसेच याचा कोणाला संशय येऊ नये म्हणून जमीन सारवल्याची रितेशने दिली आहे.

रितेशने कबूली दिल्यानंतर भाऊ किसन चव्हाण यांनी २९ फेब्रूवारी रोजी दोन्हीं माय लेकाना ग्रामीण पोलिस स्टेशनला हजर केले. त्यावेळी सर्व हकीकत रितेशने पोलिस निरीक्षक सुनील नेवसे यांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी रितेशला ताब्यात घेतले. याप्रकरणी माहिती मिळताच नायबतहसीलदार हारुण शेख, सह पोलिस अधिकारी आणि कर्मचारी जामडी घाट येथे पोचले. मयत नामदेव चव्हाण यांच्या पश्चात आई, पत्नी, रितेशसह दोन मुले, १ मुलगी आणि चार भाऊ आहे.
१० वीत शिकणारा रितेश
रितेश हा तालुक्यातील वडनेर येथील किसनराव थोरात विद्यालयात १० वीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी आहे. तो ३ मार्चपासून होणाऱ्या माध्यमिक शालांत परीक्षा देणार होता.
खड्डा खोदून प्रेत काढले
नायबतहसीलदार हारुण शेख, सह पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह वैद्यकीय पथकाच्या समोर घरात खड्डा खोदून प्रेत बाहेर काढण्यात आले. तसेच वैद्यकीय पथकातील डॉक्टरांनी जाग्यावरच शवविच्छेदन केले. त्यावेळी मयत नामदेव यांचे हात-पाय बांधल्याचे आढळले. तर मयत नामदेव यांना फास दिल्याचेही निष्पन्न झाले. यानंतर रितेश याच्यावर वडिलांचा खूनाप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.