Home विदर्भ निकृष्ट बियाण्याप्रकरणी नुकसान भरपाई देण्याचे ग्राहक आयोगाचा आदेश

निकृष्ट बियाण्याप्रकरणी नुकसान भरपाई देण्याचे ग्राहक आयोगाचा आदेश

393
अमरावती (प्रतिनिधी)
अमरावती जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष सुदाम देशमुख व सदस्या श्रीमती शुभांगी कोंडे यांनी तक्रारकर्ता चित्तरंजन ठाकरे यांना सोयाबीनच्या निकृष्ट बियाण्याकरीता रू.27,750/- व त्यावर तक्रार दाखल तारखेपासून 10 % व्याज तसेच रक्कम रू.15,000/- शारीरीक व मानसिक त्रासाकरीता व रू.10,000/- तक्रारीचा खर्च म्हणून महाबीज व बियाणे विक्रेता बोंडे ऍग्रो सर्व्हिसेस यांना देण्याचे आदेशीत केले आहे.
तक्रारकर्ता चित्तरंजन ठाकरे यांनी आपल्या शेतात पेरण्याकरीता बोंडे ऍग्रो सर्व्हिसेस यांच्याकडून महाबीज व्दारा निर्मीत सोयाबीनचे बियाणे विकत घेतले होते व तक्रारकर्त्याने महाबीजव्दारा निर्मीत सोयाबीनच्या बियाणाची पेरणी त्याच्या शेतामध्ये केली पण महाबीजव्दारा निर्मीत सोयाबीन बियाणाची उगवण कमी असल्याने तक्रारकर्त्याच्या शेतामध्ये सोयाबीनची रोप समाधानकारक उगवली नाहीत.त्यामुळे तक्रारकर्त्यांनी कृषी अधिकार्‍यांकडे सोयाबीन बियाणाच्या उगवण शक्तीबद्दल तक्रार दाखल केली.
तत्कालीन कृषी अधिकारी यांनी शासनाच्या दिशानिर्देशाप्रमाणे समिती स्थापन करून तक्रारकर्त्याच्या शेताची पाहणी करून पंचनामा तयार केला. कृषी अधिकारी यांच्या समितीमध्ये कृषीतज्ञ यांचा देखील समावेश असल्याने पंचनाम्यामध्ये महाबीज व्दारानिर्मीत सोयाबीन बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याचा निर्वाळा दिला. तक्रारकर्त्याने महाबीज यांना कायदेशीर सुचना देऊन नुकसान भरपाईची मागणी केली पण महाबीजने कायदेशीर सुचनेला उत्तर देऊन तक्रारकर्त्याचा दावा नाकारला.
तक्रारकर्त्याने ऍड.डॉ. रविंद्र उल्हास मराठे यांच्यामार्फत विद्यमान जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अमरावती यांच्याकडे बोंडे ऍग्रो सर्व्हिस व महाबीज यांच्याविरूद्ध तक्रार दाखल केली. महाबीजतर्फे ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये आपला लेखी जबाब दाखल केला व तक्रारकर्त्याचा दावा नाकारला.
तक्रारकर्त्यातर्फे ऍड.डॉ. रविंद्र मराठे यांनी युक्तीवाद करून  महाबीजने निर्मीत केल्यामुळे तसेच बोंडे ऍग्रो सर्व्हिसेस यांनी तक्रारकर्त्याला निकृष्ट दर्जाचे सोयाबीनचे बियाण विकुन अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचा युक्तीवाद केला.
तक्रारकर्त्यांचे अधिवक्ता ऍड.डॉ. रविंद्र मराठे यांनी केलेला  युक्तीवाद मान्य करून अमरावती जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष सुदाम देशमुख व सदस्या श्रीमती शुभांगी कोंडे यांनी तक्रारकर्ता विनोद ठाकरे यांना महाबीज व बोंडे ऍग्रो सर्व्हिसेस यांनी निकृष्ट दर्जाचे सोयाबीनचे बियाणे विकल्याबद्दल पिकाची नुकसान भरपाई रक्कम  रू.27,750/- व त्यावर तक्रार दाखल तारखेपासून 10 % व्याज तसेच रक्कम रू.15,000/- शारीरीक व मानसिक त्रासाकरीता व रू.10,000/- तक्रारीचा खर्च म्हणून  देण्याचे आदेशीत केले आहे.