Home महत्वाची बातमी तो चिमुकला दोन दिवस आईच्या मृतदेहा जवळ बसून रडत होता ,

तो चिमुकला दोन दिवस आईच्या मृतदेहा जवळ बसून रडत होता ,

904
0

 

 

हृददायक घटना ,

अमीन शाह

एरव्ही माणूस माणसाच्या मदतीला धावून जात असे . मात्र करोनाच्या काळात भीतीमुळे जिवंत माणसाला हात लावण्यास सध्या कोणी धजावत नाही . मृत झालेल्या आईच्या जवळ दीड वर्षांचे बाळ दोन दिवस उपाशीपोटी होते . घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने नागरिकांनी याबाबत पोलिसांना कळविले . भुकेने व्याकुळ असलेल्या बाळास जेवण भरविण्यास शेजाऱ्यांनी नकार दिला . मात्र महिला पोलिसांनी भीतीची सर्व बंधने झुगारून त्या बाळाला मायेने जेऊ घातले . हा प्रकार फुगेवस्ती , भोसरी पुणे येथे घडला , सरस्वती राजेशकुमार ( वय 29 , रा . उत्तरप्रदेश ) मृत महिलेचे नाव आहे . दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मोहन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार , मयत सरस्वती या आपल्या पतीसह कामासाठी भोसरी येथे आल्या . मात्र गावाकडे निवडणुका असल्याने पती महिनाभरापूर्वी गावी गेला होता . तेव्हापासून सरस्वती आपल्या मुलाला घेऊन फुगेवस्ती येथे राहत होत्या . एका घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती दिघी पोलिसांना नागरिकांनी दिली . घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना घर आतून कडी लावून बंद असल्याचे दिसून आले . खिडकीमधून गजाच्या साहाय्याने दरवाजाची कडी काढली . त्यावेळी घरामध्ये सरस्वती या मृत अवस्थेत दिसून आल्या . आईच्या मृतदेहाशेजारी अवघ्या दीड वर्षांचा मुलगा निपचित पडून होता . मुलगा अन्नपाण्यावाचून व्याकूळ झाला होता . यामुळे शेजारील महिलेला सांभाळ करण्याची विनंती पोलिसांनी केली . मात्र करोनाच्या भितीमुळे कोणीही त्या बाळास घेण्यास तयार झाले नाही . अखेरी दिघी पोलीस ठाण्यातील पोलीसउपनिरीक्षक बी.एस.शिखरे महिला पोलीस सुशिला गभाले आणि रेखा वाजे यांना मुलाचा सांभाळ करण्यासाठी बोलावून घेतले . त्या दोघींनीही बाळाला दूध बिस्कीट खाऊ घातले . त्यानंतर त्या बाळाला थोडीशी तरतरी आली . पुढील उपचारासाठी बाळाला रूग्णालयात दाखल केले . बाळाची करोना चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यास दिघी येथील शिशुगृहात ठेवले . व्हिसेरा राखून ठेवला तर मयत सरस्वती राजेश कुमार यांचे वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले . मृत्यूचे नेमके कारण न समजल्याने डॉक्टरांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे . दरम्यान बाळाच्या वडिलांना पोलिसांनी माहिती दिली असून ते उत्तरप्रदेशमधून भोसरी येथे येण्यास निघाले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी सांगितले . महिला पोलीस कर्मचारी सुशिला गभाले आणि रेखा वाजे यांनी बाळाबद्दल दाखवलेल्या मायेचे कौतुक होत आहे .