Home जळगाव बालकाला लस पाजून पल्स पोलिओ मोहिमेचा पालकमंत्र्यांनी केला शुभारंभ

बालकाला लस पाजून पल्स पोलिओ मोहिमेचा पालकमंत्र्यांनी केला शुभारंभ

122

रावेर (शरीफ शेख) 

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रविवारी ३१ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा प्रारंभ पालकमंत्री तथा राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लहान बालकाला पोलिओ डोस पाजून करण्यात आला.

 

जिल्हाभरात पोलिओ लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी रविवारी सकाळी पालकमंत्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ना. रंजना पाटील, महापालिकेचे महापौर भारती सोनवणे, नाशिक आरोग्य उपसंचालक डॉ. एम. एन. पट्टणशेट्टी, महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, प्रशासकीय अधिकारी डॉ. यु.बी.तासखेडकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जयकर, अधिसेविका कविता नेतकर हे उपस्थित होते.

सुरुवातीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी प्रास्तविकात, पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची माहिती सांगत जिल्ह्यात कशा प्रकारे राबविली जाणार आहे ते सांगितले. पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी दीपप्रज्वलन करीत मोहिमेचे उदघाटन केले. यानंतर रुद्राक्ष गोपाळ पाटील या बालकाला पहिला पल्स पोलिओचा डोस पाजून मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. यानंतर विलिनी विश्वजित चौधरी, नितिका आकाश चतुर यांसह रुग्णालयातील नवजात शिशु कक्षातील बालकांना पल्स पोलिओ डोस पाजण्यात आला. त्यानंतर प्रत्येक बालकाला लस पाजल्याची डाव्या हाताच्या करंगळीवर खूण करण्यात आली.

यावेळी पालकमंत्री ना गुलाबराव पाटील म्हणाले की, प्रत्येक पालकाने पाच वर्षाखालील बालकांना पोलिओ डोस पाजून घ्यावा. एकही मुलाला पोलिओ होऊ नये याकरिता आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना पोलिओ लस पाजून यंत्रणेस सहकार्य करावे असे आवाहन देखील पालकमंत्री ना. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन पूजा बऱ्हाटे, माधुरी सुरवाडे यांनी केले. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, जिल्हा सार्वजनिक आरोग्य परिचारिका विद्या राजपूत, अर्चना धिमते, जयश्री वानखेडे उपस्थित होते.

मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी अधिपरिचारिक रोहित देसाई, संपत मल्हार, अधिपरिचारिका कुमुद जवंजार, कक्षसेवक मंगेश बोरसे, स्वच्छता निरीक्षक अनिल बागलाणे, सुधीर करोसिया, जनसंपर्क सहाय्यक विश्वजीत चौधरी यांनी परिश्रम घेतले.