June 5, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

कोरोना : वैद्यकीय महाविद्यालयात 500 खाटांच्या सुसज्ज रुग्णालयाचे नियोजन – पालकमंत्री संजय राठोड

नागरिकांनी शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन

यवतमाळ – जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग असलेल्या तीन पॉझेटिव्ह नागरिकांचे नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यासाठी दिलासा देणारी ही बाब असून जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग अभिनंदनास पात्र आहे. मात्र असे असले तरी कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नाही. त्यामुळे या आव्हानाचा सामना करण्यासाठी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अतिरिक्त 500 खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयाच्या पुर्वतयारीनिमित्त आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, डॉ. बाबा येलके, सा.बा. विभागाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीकर आदी उपस्थित होते.
सध्या येथील वैद्यकीय महाविद्यालयात 765 नियमित खाटा आहेत, असे सांगून श्री. राठोड म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर येथील जुन्या रुग्णालयात 220 खाटांचे तर मुले आणि मुलींच्या वसतीगृहात प्रत्येकी 125 असे जवळपास 500 खाटांचे रुग्णालय येत्या दहा – बारा दिवसात तयार होईल. याचा लाभ यवतमाळ आणि वाशिम तसेच इतरही जिल्ह्यातील नागरिकांना होणार आहे. इतर राज्यातून जे नागरिक यवतमाळ येथे येत आहे, त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी धोरण आखण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. इतर ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांनी आता आहे तेथेच राहावे. त्यांच्या राहण्याची तसेच भोजनाची व्यवस्था करण्यात येईल.
सर्वांच्या सहकार्याने कोरोना विरुध्दची ही लढाई जिंकायची आहे. त्यासाठी नागरिकांनी शासन आणि प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे. नागरिकांनी घरातच राहावे. बाहेर फिरु नये. तसेच स्वच्छता ठेवणे, वारंवार हात स्वच्छ धुणे, एकमेकांच्या संपर्कात न येणे, अत्यावश्यक कारणासाठी बाहेर गेले तर अंतर राखणे आदी सुचना आपल्या भविष्यासाठी महत्वाच्या आहेत. त्या कृपाकरून सर्वांनी पाळाव्यात. राज्यातील वन विभागाचे सर्व अधिकारी – कर्मचारी आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरीता देणार आहे. त्यांना वनमंत्री म्हणून आवाहन केले होते, या आवाहनाला विभागाच्या सर्वांनी होकार आहे. संकटाच्या या काळात सर्व शासकीय अधिकारी, इतर सामाजिक संघटना सरकारला सहकार्य करीत आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

तसेच जिल्ह्यातील खाजगी सेवा देणा-या डॉक्टरांनी आपले दवाखाने त्वरीत उघडावे. त्यांच्या समस्यांचा विचार करून त्यांना आवश्यक बाबी उपलब्ध करून देण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. याशिवाय किराणा दुकानदार यांनी वस्तुंच्या किमती वाढवून विक्री करू नये. असे निदर्शनास आल्यास प्रशासन त्यांच्यावर कारवाई करेल, असेही त्यांनी सांगितले.

वैद्यकीय महाविद्यालयातील शिवभोजन थाळी पूर्ववत सुरू : संचारबंदीच्या काळात वैद्यकीय महाविद्यालयात भरती असलेल्या नागरिकांच्या आप्तस्वकीयांना जेवणाचा प्रश्न भेडसावत होता. या बाबीची दखल घेऊन पालकमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून येथील शिवभोजन थाळी पुर्ववत सुरू करून घेतली आहे. त्यामुळे नागरिकांना आता या भोजनाचा लाभ घेता येणार आहे.
बैठकीला वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ डॉक्टर्स आदी उपस्थित होते.

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!