Home विदर्भ Yavatmal – जेष्ठ पत्रकारांचा सन्मान व कौटुंबिक स्नेहमिलनाद्वारे पत्रकार दिन साजरा.

Yavatmal – जेष्ठ पत्रकारांचा सन्मान व कौटुंबिक स्नेहमिलनाद्वारे पत्रकार दिन साजरा.

170
यवतमाळ –  महाराष्ट्र राज्य श्रमिक पत्रकार संघ, मुंबई संलग्नित श्रमिक पत्रकार संघ यवतमाळ च्या वतीने जेष्ठ पत्रकारांचा सन्मान व पत्रकारांचे कौटुंबिक स्नेहमिलन आयोजित करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला. गुरुवारी ६ जानेवारीला सायंकाळी एकवीरा सेलिब्रेशन हॉल मध्ये हा रंगारंग सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार सुरेश गांजरे होते. आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात झाली. यवतमाळच्या पत्रकार सृष्टींत आपले योगदान देऊन पत्रकारितेचा थोर वसा नव्या पिढीला दिलेल्या जेष्ठ पत्रकार लक्ष्मणलाल खत्री, पद्माकर मलकापूरे, प्रा. नारायण मेहरे, आणि सुरेश गांजरे यांचा सन्मान श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत राऊत व सचिव सुरेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी केला.
यावेळी मार्गदर्शक समितीचे प्रमुख रघुवीरसिंह चौहान, राज्य कार्यकारिणी प्रतिनिधी नागेश गोरख व गणेश राऊत यांची उपस्थिती होती. श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यकारिणीने केवळ संघटना एवढा उद्देश न ठेवता पत्रकारांचे कुटुंब ही संकल्पना स्वीकारून जेष्ठांच्या मार्गदर्शनाने वाटचाल सुरु केल्याबद्दल कौतुक लक्ष्मणलाल खत्री यांनी केले. यवतमाळ जिल्ह्यात पत्रकारितेची थोर, उज्वल व अभिमानास्पद अशी परंपरा आहे. पत्रकारितेचा हा समृद्ध वसा आजच्या पिढीनेही जोपासला पाहिजे. पत्रकारितेचा अडचणींचा काळ बदलला असून ह्या व्यवसायात आता अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहे. त्यामुळं पत्रकारिता हे व्रत म्हणून जोपासलं पाहीजे असे मार्गदर्शन प्रा नारायण मेहरे यांनी केले. तर यवतमाळ मध्ये श्रमिक पत्रकार संघाचे कार्य ८० च्या दशकात सुरु केल्यापासूनची वाटचाल पद्माकर मलकापुरे यांनी सांगितली. ह्या संघात नव्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांच्या समस्यांबाबत कार्य करावे, आजच्या पत्रकारांनी व्यावसायिक पत्रकारिता करतानाच पत्रकारितेची मूल्य देखील जोपासली पाहिजे, यवतमाळ मधून पत्रकार पृथ्वीगीर हरिगीर गोसावी यांनी ज्या पद्धतीनं पत्रकारितेतून स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला त्यानुसार पत्रकारांनी आपल्या लेखणीतून समाजाला जागृत करण्याचं व्रत सोडू नये असे मार्गदर्शन देखील पद्माकर मलकापूरे यांनी केले. या कार्यक्रमाचे संचलन अंकुश वाकडे यांनी केले. यावेळी पत्रकार कुटुंबातील सदस्यांकरिता आयोजित प्रश्नमंजुषा आणि विविध स्पर्धांनी कार्यक्रमात रंगत आणली. विजेत्या स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. स्वाती गावंडे आणि सोनल फाळके यांनी या स्पर्धेचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमात वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष अशोक शिंदे आणि सचिव संतोष शिरभाते तसेच कोरोना काळात सेवा देणारे ललित जैन यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात जिल्हा माहीती अधिकारी मनीषा सावळे, सुमित बाजोरिया, साहेबराव पवार, यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष अजय मुंधडा, विलास महाजन, आयएमए चे अध्यक्ष डॉ संजीव जोशी, नगरसेवक नितीन मिर्झापुरे, आनंद शर्मा, अमोल ढोणे यांनी भेट देऊन पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. 

दिवंगत पत्रकारांना श्रद्धांजली….!

यवतमाळ पत्रकारिता क्षेत्रात कार्य केलेल्या पत्रकार सा. ग्रामछाया च्या संपादक पुष्पा चौपाने, दै कर्दनकाळचे संपादक अजय अंगाईतकर, पत्रकार प्रदीप येलमे व प्रवीण दमकोंडवार यांचे नजीकच्या काळात निधन झाल्याने व कोरोना काळात जीव गमावलेल्या सर्व कोरोनायोद्धा दिवंगत पत्रकारांना श्रमिक पत्रकार संघाने यावेळी श्रद्धांजली वाहिली. तसेच दर्पण पुरस्कार प्राप्त पत्रकार दै सिंहझेप चे संपादक दिवंगत देविदास भोरे यांच्या स्मृती निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.