Home विदर्भ अमरावती जिल्ह्यातील तरूणांसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती जिल्ह्यातील तरूणांसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

103

बेरोजगार युवक-युवतींना लॉकडाऊननंतर नोकरीची सुवर्णसंधी

ऑनलाईन मेळाव्यांना 30 जूनपासून प्रारंभ
अमरावती 23/6/2020

मनिष गुडधे

लॉकडाऊनमधील शिथिलीकरणानंतर सुरु झालेल्या उद्योग- व्यवसायांना मनुष्यबळ मिळवून देण्यासाठी व जिल्ह्यात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात कुशल मनुष्यबळ निर्माण होण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमाला गती देण्यात येईल, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील लॉकडाऊनमुळे असंख्य परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर झाले. शिथीलीकरणानंतर काही उद्योग- व्यवसाय सुरु करण्यात आले आहेत. या अनुषंगाने औद्योगिक कंपन्यांना मनुष्यबळाची कमतरता भासते. त्यामुळे कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी व रोजगारनिर्मितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे ऑनलाईन मेळावे घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना होत असताना रोजगारनिर्मिती थांबू नये व पुरेशी दक्षता घेऊन सुरक्षितता राखली जावी, या हेतूने ऑनलाईन उपक्रमांना चालना देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिली.
मेळाव्यात व्हिडीओ कॉन्फरन्स व इतर डिजीटल माध्यमातून मुलाखती घेण्यात येतील. स्थानिक स्तरावर उद्योग-व्यवसायांची भरभराट व रोजगारनिर्मितीसाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. स्थानिक स्तरावर कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमाला गती देण्यात येईल, असे यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

30 जूनला होणार ऑनलाईन मेळावा

केंद्रातर्फे दि. 30 जूनला ऑनलाईन पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील नामांकित आस्थापना, कंपनींतील विविध प्रकारच्या रिक्त पदांची गरज लक्षात घेऊन विविध उद्योग-व्यवसायांशी संपर्क साधून सहभाग मिळविण्यात आला आहे. या ऑनलाईन रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील विविध नामवंत उद्योजकांकडील सर्वसाधारणपणे सेल्स ऑफिसर, ट्रेनी, कॅशियर, डाटा एन्ट्री ऑपरेटर, अकुशल कामगार यासारख्या पदांसाठी भरती होणार आहे, अशी माहिती सहायक कौशल्य विकास व रोजगार आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी दिली.
मेळाव्यात 200 हून अधिक रिक्त पदे उपलब्ध होणार आहेत. एस. एस. सी., एच. एस. सी., पदवीधर उमेदवारांना सहभाग घेता येईल. टेक्नोक्रॉफ्ट, नवभारत, पालेकर बेकरी, नवभारत, चक्रधर एजन्सी, रेडिएंट हॉस्पिटल अशा स्थानिक उद्योग-व्यवसायांनाही मेळाव्यात सहभाग देण्यात आला आहे. केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांनाच नोकरीची संधी प्राप्त होणार आहे, असेही ते म्हणाले.

युवकांना ऑनलाईन नोंदणीचे आवाहन

कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या (सेवायोजन कार्यालयाच्या) पोर्टलद्वारे युजर आयडी व पासवर्डच्या आधारे नोंदणी करता येते. www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाद्वारे लॉगिन करून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उचित रिक्त पदासाठी आपला सहभाग पसंतीक्रमानुसार ऑनलाईन पद्धतीने नोंदवावा. पसंतीक्रम नोंदविताना शक्यतो आसपासच्या ठिकाणी निवड करण्याची दक्षता घ्यावी. इच्छूक व ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योगांच्या समन्वयातून मुलाखतीची तारीख व वेळ एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. इच्छूक युवक व युवतींनी दि. 30 जूनपर्यंत पसंतीक्रम नोंदविण्याचे आवाहन रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने केले आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक (0721) 2566066 किंवा ई-मेल amravatirojgar@gmail.com यावर संपर्क साधण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे.

आस्थापनांनाही नोंदणी करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील आस्थापनांनी त्यांच्याकडे रिक्त झालेल्या पदांची मागणी ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटवर नोंदवावी. या संकेतस्थळाद्वारे रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमात रिक्त पदे अधिसूचित करणे, कुशल मनुष्यबळ माहितीची उपलब्धता, रोजगार मेळाव्यात सहभाग, त्रैमासिक ई-आर-1 ऑनलाईन पद्धतीने सादर करणे यासारख्या सेवा अंतर्भूत आहेत. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्ह्यातील आस्थापनांना करण्यात आले आहे.