August 5, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

कोरोना परिस्‍थीतीवर ग्रामीण भागात विशेष दक्षता ; परप्रांतातून, अन्‍य जिल्‍ह्यातून आलेल्या ९६ हजार १४७ नागरीकांची तपासणी

नांदेड, दि. १२ : – ( राजेश भांगे ) – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी 24 मार्च पासून लावण्‍यात आलेल्‍या लॉकडाऊनच्‍या काळात परप्रांतातून व अन्‍य जिल्‍ह्यातून नांदेड जिल्‍ह्यात रविवार 10 मे पर्यंत आलेल्‍या नागरीकांची एकुण संख्‍या 96 हजार 147 असून त्‍यांची प्रत्‍येकाची आरोग्‍य तपासणी करुन त्यांना 28 दिवसाच्‍या होम क्‍वारंटाईनचा सल्‍ला देऊन, हातावर होम क्‍वॉरेंटाईन शिक्‍के मारण्‍यात येऊन निरिक्षणाखाली ठेवण्‍यात आले आहे.

आरोग्‍य विभाग व अन्‍य यंत्रणेमार्फत विविध उपाययोजना करण्‍यात येत आहेत. नांदेड जिल्‍ह्यातील सर्व गावांमध्‍ये कोरोना विरोधात जनजागृती करण्‍यात येत असून आरोग्‍य विभाग कोरोना महामारीच्‍या परिस्‍थीतीवर ग्रामीण भागात विशेष दक्षता घेत आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी दिली आहे.

नागरिक परप्रांतातून व अन्‍य जिल्‍ह्यातून नांदेड जिल्‍ह्यात परत आलेली संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. अर्धापूर 2983, भोकर 4339, बिलोली 5402, देगलूर 8962, धर्माबाद 1948, हदगाव 6852, हिमायतनगर 2975, कंधार 12500, किनवट 3396, लोहा 7566, माहूर 4585, मुदखेड 2191, मुखेड 14248, नायगाव 7299, नांदेड 2844, उमरी 2781, नांदेड मनपा 5146 असे एकुण 96 हजार 147 नागरिक परप्रांतातून व अन्‍य जिल्‍ह्यातून नांदेड जिल्‍ह्यात परत आले आहेत.

लॉकडाऊन काळात जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, जि.प.मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुलकर्णी यांच्‍या मार्गदर्शनाखाली जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांची टिम या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी आहोरात्र परिश्रम घेत आहे.

नांदेड जिल्ह्यात ग्रामीण भागात आरोग्‍य विभागामार्फत कोविड-19 अंतर्गत कोरोना, SARI (Severe Acute Respiratory Illness) वILI (Influenza Like Illness) च्‍या प्रतिबंध उपाययोजनासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षणाकरीता आशा, आरोग्‍य सेवक आणि समुदाय आरोग्‍य अधिकारी यांची 3 हजार 629 पथके तयार करण्‍यात आली असून या पथकामार्फत ग्रामीण भागात दैनंदिन सर्वेक्षण मागील दिड महिण्‍यांपासून सातत्‍याने करण्‍यात येत आहे. या सर्वे क्षणामध्‍ये नांदेड जिल्‍ह्यातील प्रत्‍येक गावात, वाडी वस्‍त्‍यांमध्‍ये बाहेर जिल्‍ह्यातून येणाऱ्या सर्व व्‍यक्‍तींची ताप सर्दी खोकला व तत्सम लक्षणे असलेल्‍या रुग्‍णांची माहिती घेऊन अति जोखमीच्‍या व कमी जोखमीच्‍या रुग्‍णांना आवश्‍यकतेनुसार कोरोना केअर सेंटर अथवा जिल्ह्याच्‍या डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल्‍स येथे संदर्भित करण्‍यात येत आहे.

नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेने घाबरुन जाऊ नये व आपल्‍या घरातच राहावे. गरज असेल तरच बाहेर जावे. ताप किंवा कोरोना सदृश्‍य लक्षणे आढळल्‍यास तातडीने नजिकच्‍या ताप उपचार केंद्रामध्‍ये जाऊन तपासणी व उपचार करुन घ्‍यावेत. सर्वेक्षणात आपल्‍या घरी येणाऱ्या सर्व आरोग्‍य कर्मचऱ्यांना योग्‍य ती खरी माहिती देऊन सहकार्य करावे. हात वारंवार साबनाने स्‍वच्‍छ धुवावेत, संपर्कातील व्‍यक्‍तींशी योग्‍य अंतर ठेवावे, मास्‍क अथवा स्‍वच्‍छ रुमाल वापरावा, साथ पसरु नये यासाठी सर्वांनींच काळजी घ्‍यावी. तसेच आपल्‍या मोबाईलमध्‍ये आरोग्‍य सेतू अॅप डाउनलोड करुन त्‍याचा वापर करावा, असेही आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले आहे.

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!