Home बुलडाणा पॉझिटिव्ह व्यक्तीच्या कुटुंबातील तेरा जणांची बुलडाणा येथे रवानगी….!

पॉझिटिव्ह व्यक्तीच्या कुटुंबातील तेरा जणांची बुलडाणा येथे रवानगी….!

261

साखरखेर्डा येथे भीतीचे वातावरण..

यंत्रणा लागली कामाला…

दीपक नागरे

सिंदखेडराजा – सुलतानपूर, ता. लोणार येथील कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नंतर साखरखेर्डा येथील दोन व्यक्तींना तपासणीसाठी बुलडाणा येथे पाठविण्यात आले होते.

त्यातील एक व्यक्ती आज कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यावर साखरखेर्डा व परिसरात एकच खळबळ उडाली. पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील तेरा जणांना यंत्रणेकडून तपासणीसाठी बुलडाणा येथे रवाना करण्यात आले आहे.
सुलतानपूर, ता. लोणार येथील एक महिला दि. २६ जून रोजी पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. त्या महिलेचे माहेर साखरखेर्डा असून तिचे वडील वारल्याने ती साखरखेर्डा येथे आली होती. तिच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वरुन, माहेरच्या कुटुंबातील दोन व्यक्तींना संशयित म्हणून बुलडाणा येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील एका व्यक्तीचा चाचणी अहवाल आज दि. २९ जून, सोमवारी पाझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आरोग्य व पोलीस विभागाकडून त्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या कुटुंबातील व नातेवाईक मिळून तेरा व्यक्तींना आज तपासणीसाठी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी संदीप सुरुशे यांनी दिली आहे. या वेळी गटविकास अधिकारी किशोर शिंदे, ठाणेदार संग्राम पाटील, दुय्यम ठाणेदार दीपक राणे, गणेश डोईफोडे, पोहेकाँ नारायण गीते, पोकॉ विशाल बनकर, राजू मापारी, नितीन मापारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा सेविका आदि उपस्थित होते.

गाव झाले बंद …

कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती सापडल्याचे अधिकृत वृत्त येताच गावात एकच खळबळ उडाली. त्याचवेळी पोलिसांनी गावात फेरफटका मारत, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहारांना बंद करण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत व्यावसायिकांनी आपापली प्रतिष्ठाने स्वतः बंद केली. त्यामुळे पुन्हा एकदा गावात शुकशुकाट निर्माण झाला आहे. सकाळपासून संबंधित यंत्रणेकडून गावातील कंटेनमेंट झोनची निश्चिती करणे व त्यानंतर सीलबंद करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे.