Home मराठवाडा जिल्हाधिकाऱ्यांनी नाक दाबताच बिडीओचे उघडले तोंड…..

जिल्हाधिकाऱ्यांनी नाक दाबताच बिडीओचे उघडले तोंड…..

99

लक्ष्मण बिलोरे

जालना – जालनाचे कर्तव्यतत्पर जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी नाक दाबताच जालना जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या बदनापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याने तोंड उघडून रेडझोन असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातून दररोज अपडाऊन करत असल्याची कबुली दिली असल्याचे सरकारी सूत्रांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जालना येथील विविध शासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी वास्तव्य करून रहावे असे आदेश जिल्हाधिकारी श्री रविंद्र बिनवडे यांनी मागील दोन महिन्यांपूर्वी दिलेले आहेत. महत्वाचे म्हणजे जालना जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या औरंगाबाद आणि बुलढाणा या दोन्ही जिल्ह्यात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव वाढला होता.सद्यस्थितीत बुलढाणा जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात असली तरी औरंगाबाद जिल्ह्यातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात दररोज २० पेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन येत असून या जिल्ह्यात आज गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्णाची संख्या चारशेच्या जवळपास पोहचली असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे हा जिल्हा राज्य शासनाने यापूर्वीच रेडझोन मध्ये समाविष्ट केला आहे. जालन्यात राज्याचे आरोग्य मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री श्री राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली जालन्याचे जिल्हाधिकारी श्री रविंद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री एस.चैतन्य, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा या तिन्ही कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस प्रशासन,जिल्हा परिषद प्रशासन, जिल्हा सरकारी रुग्णालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सामूहिक व प्रामाणिक प्रयत्नातून जालना जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू दिला नाही. मात्र काही शासकीय कार्यालयातील अधिकारी रेडझोन घोषित करण्यात आलेल्या औरंगाबाद व बुलढाणा सारख्या जिल्ह्यातून दररोज अपडाऊन करून जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांमध्ये जाणीवपूर्वक खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत. मागील महिन्यात विविध अशा अपडाऊन करणाऱ्या २१ अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावून तीन दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. या नोटीसा बजावतच बहुतांशी अधिकारी अगदी दुसऱ्याच दिवशी जालन्यात दाखल झाले होते. परंतु त्यानंतरही अनेक अधिकारी औरंगाबाद सारख्या रेडझोन जिल्ह्यातून दररोज अपडाऊन करत असल्याच्या तक्रारी आहेत.बदनापूरचे गटविकास अधिकारी विठ्ठल हरकल हे बदनापूर येथे दररोज औरंगाबाद येथून अपडाऊन करत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी श्री बिनवडे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अरोरा यांच्याकडे प्राप्त झाल्याचे या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आज गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान दस्तुरखुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी हरकल यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून आपण कुठे आहात अशी विचारणा त्यांच्याकडे केली असता बदनापूर मध्येच असल्याचे खोटे उत्तर देऊन हरकल यांनी जिल्हाधिकारी यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असल्याचे समजते.मात्र कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी संबधित बीडीओला आपण ज्या ठिकाणी आहेत त्या स्थळाचे लोकेशन देण्याचे आदेश देताच बीडीओ हरकल यांची बोबडी वळली आणि आपण बदनापूरला नव्हे तर औरंगाबाद येथे असल्याची कबुली जिल्हाधिकाऱ्यांजवळ दिली.खोटे उत्तर दिल्यामुळे संतापलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात हजर होण्याचे आदेश दिल्यानंतर धांदलून गेलेले बीडीओ हरकल आहे त्या स्थितीत औरंगाबाद येथून तातडीने जालन्याकडे रवाना झाले आणि सायंकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात हजर झाले. जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी त्यांच्या दालनात हरकल यांची चांगलीच कानउघाडणी करून मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अरोरा यांच्या कानावर हा प्रकार टाकला असून बीडीओ हरकल यांच्यावर जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसली तरी त्यांच्यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.