Home रायगड पोलादपूर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबध्द – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

पोलादपूर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबध्द – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

63
0

कर्जत – जयेश जाधव

गडकिल्ल्यांचे संवर्धन ही शासनाची जबाबदारी आहे. केवळ इतिहासात रमण्यापेक्षा इतिहास घडविणे महत्त्वाचे आहे. पोलादपूर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले.

आज उमरठ ता.पोलादपूर येथे महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद रायगड आणि नरवीर तानाजी मालुसरे सोहळा समिती यांच्यावतीने नरवीर तानाजी मालुसरे यांच्या 350 व्या पुण्यतिथीनिमित्त समाधी वास्तूचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, आ.भरत गोगावले, आ.अनिकेत तटकरे, आ.महेंद्र दळवी, आ.महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी निधी चौधरी आदि मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, आजचा दिवस पवित्र दिवस आहे. थोर पुरुषांचे महत्व माहिती असणे आवश्यक आहे. गडकिल्ल्यांचे संवर्धन आवश्यक आहे. गडकिल्ल्यांचे रक्षण शिवरायांनी केले ते आपले खरे वैभव आहे. शिवनेरीहून माती घेऊन मी आयोध्येला गेलो होतो आणि एक वर्षाच्या आत रामजन्मभूमीचा विषय पुढे आला. शिवनेरीच्या मातीमुळे मला मुख्यमंत्री पद मिळाले. गडकिल्ल्यांची माती ही चमत्कार करणारी माती आहे. यात अनेकांचे रक्त सांडले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव म्हटले की चैतन्य येते. शासनाचे धोरण हे पर्यटन विकासाचे आहे. इतिहासात रमण्यापेक्षा इतिहास घडविणे महत्त्वाचे आहे. स्वराज्य रक्षणासाठी मुठभर मावळे होते. पण त्यांची मुठ मजबूत होती. या परिसराच्या सर्वांगिण विकासासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले. आयुष्याची राखरांगोळी होईल हे माहित असून सुध्दा आयुष्यपणाला लावणारी तानाजी सारखी माणसे महाराजांनी तयार केली. आयुष्य कसे जगावे हे दाखविण्यासाठी या परिसरामध्ये तुम्ही जे-जे मागाल ते देईन असे मी वचन देतो.

माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे आपल्या भाषणात म्हणाल्या की, आजचा सोहळा गौरवाची बाब आहे. पोलादपूर तालुका हा दुर्गम तालुका आहे. मात्र तो डोंगराळ म्हणून घोषित व्हावा. सध्या या परिसराला “क” वर्ग पर्यटन दर्जा प्राप्त आहे. तो “ब” वर्ग केला जाईल. वाढते पर्यटक लक्षात घेता, याठिकाणी लवकरच बचतभवन उभे केले जाईल. त्यात प्रशिक्षण आणि विक्रीची सुविधा असेल. 5 कोटी रुपये खर्चातून पोलादपूर तालुका क्रीडा संकूल उभे केले जाईल. प्रशासकीय इमारत तालुक्यासाठी लवकरच उभी केली जाईल. आजच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहिल्याने एक वेगळे वैभव प्राप्त झाले आहे. असे त्या म्हणाल्या.

आ.भरत गोगावले यांनी प्रास्ताविक करून तालुक्याच्या विविध समस्या मांडल्या. मा.मुख्यमंत्री यांच्या हस्ते कृषि विभागाच्या शेतकरी योजनेच्या चित्रफितीचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमास प्रसिध्दी वक्ते नितीन बानकुळे-पाटील यांचेही व्याख्यान झाले. शेवटी चंद्रकांत कळंबे यांनी आभार मानले. कार्यक्रमास परिसरातील लोकप्रतिनिधी आणि सर्व सामान्य जनतेने मोठी गर्दी केली होती.