Home मराठवाडा राम भक्तांना पोलिसांनी रस्त्यावरच रोखले…!

राम भक्तांना पोलिसांनी रस्त्यावरच रोखले…!

362

 

जांबसमर्थ येथील मुर्ती चोरी प्रकरण – ग्रामस्थांचा रस्त्यावरच दोन तास ठिय्या,पोलीस अधिक्षकांच्या आश्‍वासनानंतर आंदोलन मागे

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्यातील जांबसमर्थ सह परिसरातील रामभक्तांनी आयोजित केलेल्या ठिय्या आंदोलनासाठी जाणार्‍या रामभक्तांना पोलिसांनी जून्या बसस्थानकाजवळच थांबविल्याने ग्रामस्थांनी रस्त्यावरच दोन तास ठिय्या दिला, दरम्यान पोलिस अधिक्षकांच्या ठोस आश्‍वासनानंतरच ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
जांबसमर्थ येथील समर्थ रामदास स्वामींच्या देवघरातील मुर्तीच्या चोरीला दहा दिवस उलटले परंतू अद्याप तपास लागला नाही या पार्श्‍वभूमीवर गावकर्‍यांनी दि.30 रोजी ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता. जांब समर्थ येथील ग्रामस्थ मंगळवारी सकाळी 11 वाजता संत रामदास कॉलेजपासून ग्रामस्थ राम नामाचा जयघोष करत निघाले असता शहरातील जून्या बसस्थानकाजवळ त्यांना पोलिसांनी आडवले. यावेळी संतप्त नागरिकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडून पोलिसांचा निषेध व्यक्त केला. या ठिय्या आंदोलनात सहभागी झालेले समर्थांचे अकरावे वंशज प.पू.भूषण महारूद्र स्वामी यांनी राम नामाचा जप, भजन, मनाचे श्‍लोक, भीमरूपी व अभंगाचे वाचन केले. यावेळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिस उपविभागीय अधिकारी सुनील पाटील, घनसावंगी पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी घटनास्थळी जावून ग्रामस्थांची भेट घेतली. दरम्यान पोलिस अधिक्षकांनाही फोनद्वारे भूषण स्वामींशी संवाद साधला. आमचा तपास चालू असून त्याची व्याप्ती आम्ही अजून वाढवणार असून आम्हाला तपासासाठी अजून कालावधी द्यावा, लवकरात लवकर गुन्हेगारांना पकडून शासन करण्यात येईल असे आश्‍वासन पोलिस अधिक्षकांनी दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी आंदोलनाला जांबसमर्थ गावासह पंचक्रोशीतील गावकर्‍यांची मोठ्या प्रामाणात उपस्थिती होती.
दरम्यान ,ज्यावेळी ठिय्यासाठी ग्रामस्थ घनसावंगीला रवाना झाले अगदी त्याच वेळी जांबसमर्थ गावातील श्रीराम मंदिरात महिलांनी चूलबंद आंदोलन केले. यावेळी इतर गावातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.

*हे वाचा*
————-
*तपासाची व्याप्ती अजून वाढवावी*
चोरीला दहा दिवसांचा कालावधी लोटला असून अद्यापपर्यंत कुठलाही ठोस पूरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. याबाबत आम्हाला खूप दुःख होत आहे. पोलिसांनी तपासाची व्याप्ती अजून वाढवावी व श्रीरामरायांना पून्हा एकदा आमच्या देव्हार्‍यात विराजमान करावे एवढीच आमची माफक अपेक्षा आहे. पोलिसांना आम्ही अजून काही दिवसांचा कालावधी देत आहोत त्यानंतर आम्ही आमची भूमिका मांडू.
*- प.पू.भूषण स्वामी (समर्थ वंशज)*

हे पण वाचा
—————-
*मुख्यमंत्र्यांनी दिले आश्‍वासन*
सोमवारी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी जांबसमर्थ येथे भेट देऊन पाहणी केली असता मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, आम्ही पोलिसांच्या संपर्कात असून लवकरच त्यांना पकडण्यात यश येईल तसेच ग्रामस्थांनी संयम ठेवावा आम्ही आमचे काम चोख पद्धतीने करत असल्याचे सांगितले.