Home जळगाव उटखेडा परिसरातील रस्ते दुरुस्तीच्या प्रतिक्षेत , “रस्त्यात खड्डा आहे की खड्डयात रस्ता”

उटखेडा परिसरातील रस्ते दुरुस्तीच्या प्रतिक्षेत , “रस्त्यात खड्डा आहे की खड्डयात रस्ता”

95
0

रावेर (शरीफ शेख )

तालुक्यातील  उटखेडा परीसरातील अनेक रस्त्यांची अवस्था पाहिल्यावर ‘ रस्त्यात खड्डा आहे की खड्डयात रस्ता ‘ हेच समजून येत नाही . अनेक रस्ते धोकादायक स्थितीत असून दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे .


गावागावातील रस्त्याची स्थिती बिकट झाली आहे . रावेर शहरातुन उटखेडा मार्गे खिरोदा येथे जाणारा रस्ता, उटखेडा ते मुंजलवाडी रस्ता, उटखेडा ते चिनावल रस्ता, कुसुंबा ते रावेर रस्ता, कुंभारखेडा फाटा ते कुंभारखेडा गावापर्यंतचा रस्ता असे किती तरी रस्ते खड्डेमय झाले आहेत . ग्रामीण भागातील अनेक रस्त्याची पारिस्थिती पाहता वाहनचालकांना जीव मुठीत घेऊनच वाहने चालवावी लागत आहेत . भाटखेड्यापासून ते रावेर पर्यंतचा रस्ता अतिशय बिकट झाला असून या रस्त्यात भाटखेड्यापासून थोडया अंतरावर बरडाच्या पुढे पपईच्या कारखान्याजवळ दोन्हीं बाजूच्या साईट पट्टया खोलवर गेल्या असून वळण रस्ता आहे . येथे समोरा – समोर वाहने आल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे . रस्त्यावरील खंड्डयांमुळे अपघात होऊन अनेक वाहन धारकांना दुखापत झालेली आहेत . मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे .
शहरी किंवा ग्रामीण भागातील विकास हा रस्त्यांवर अवलंबून असतो . रस्त्यांवरून होणारी वाहतूक ही सुरळीत आणि जास्त वेगाने होणे गरजेचे आहे . तरच विकासाला गती मिळते . परंतु, सध्या रस्तेच खड्डेमय झाले आहेत . त्यामुळे एकप्रकारे विकासाला खीळ बसत आहे . हे रस्ते खड्डेमय असल्याने नियमित दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना पाठ, मान, कंबरदुखी बरोबरच मणक्याचे आजार जडले आहेत . त्यामुळे उपचारासाठी रूग्णालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत . बऱ्याचदा गरोदर माता व वृध्दांसाठी हे रस्ते पार करणे म्हणजे मैलाचा दगड ठसतो . रात्री – अपरात्री हे रस्ते वाहनांसाठी घातक ठरत आहे . त्यामुळे वाहनधारकानकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे .
ठळक मुद्दे : १) ” रस्त्यात खड्डा की खड्डयात रस्ता ” अशी स्थिती २) रस्ते धोकादायक – वाहन धारकांमधून व्यक्त केला जातोय संताप . ३) उटखेडेकरांचे कंबरडे मोडले.