Home सोलापुर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र व पुतळ्यासाठी शासनाकडून भरीव मदत करणार मुख्यमंत्री,...

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र व पुतळ्यासाठी शासनाकडून भरीव मदत करणार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उच्च शिक्षणमंत्री यांच्या हस्ते ऑक्‍टोबरमध्ये भूमिपूजन सोहळा

168

सोलापूर , दि. 19–  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये अहिल्यादेवींचा अध्यासन केंद्र व अश्वारूढ पुतळ्यासाठी राज्य शासनाकडून भरीव मदत करणार असल्याची ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री अजित पवार आणि उच्च शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत एका शानदार सोहळ्यात येत्या ऑक्‍टोबरमध्ये भूमिपूजन सोहळाही होईल, असे श्री सामंत यांनी आज बैठकीत सांगितले.

बुधवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये अहिल्यादेवींचा पुतळा व अध्यासन केंद्र संदर्भात शिक्षणमंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, आमदार रोहित पवार, शिक्षण संचालक डॉ. धनराज माने आणि कुलसचिव डॉ. विकास घुटे यांचा सहभाग होता.

यावेळी कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवींचा अध्यासन केंद्र आणि पुतळा उभारण्यासाठी दोन कोटी 50 लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केल्याची माहिती दिली. प्रस्तावात असलेल्या प्रमुख बाबींची माहितीही त्यांनी यावेळी शिक्षणमंत्री श्री सामंत यांच्याकडे सादर केली. त्यानंतर शिक्षणमंत्री सामंत यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून पाठवलेला प्रस्ताव मंजूर करण्यात येईल व विद्यापीठामध्ये अहिल्यादेवींच्या नावाने अध्यासन केंद्र आणि अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी राज्य शासनाकडून भरीव मदत करण्यात येईल, असे सांगितले.

त्याचबरोबर कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर येत्या ऑक्टोबर महिन्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत एका शानदार सोहळ्यात भूमिपूजन करण्यात येईल, असेही श्री सामंत यांनी यावेळी सांगितले. त्यादृष्टीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून तयारी करण्यात यावी, अशाही सूचना यावेळी मंत्री सामंत यांनी दिल्या. कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी यावेळी आभार मानले.

पाठपुराव्याला यश…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे नावे अध्यासन आणि भव्य दिव्य स्मारक करण्याचा प्रस्ताव अध्यासन समितीचे अध्यक्ष डाँ.महेंद्र कदम,सदस्य डाँ.प्रभाकर कोळेकर,डाँ.शिवाजी वाघमोडे, श्री.रामभाऊ लांडे (अभ्यासक होळकर रियासत),प्रा.स्वाती घाटुळे यांनी सादर करुन लवकरात लवकर अध्यासन केंद्राला मंजुरी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू होते सर्वांच्या प्रयत्नांना यश आले .
तर चौंडी येथील अक्षय शिंदे पाटील यांनी आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून उच्च तंत्र शिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांची भेट घेवून अध्यासन आणि स्मारक समितीच्या मुद्यावर निवेदन दिले होते तर धनगर विवेक जागृती अभियानाचे प्रमुख विक्रम ढोणे यांनी नुकतेच जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन दिले होते.
तर या विषयात न्याय मिळावा याकरिता विद्यापीठातील परिक्षा विभागाचे कक्ष अधिकारी दिगबंर हराळे ,श्री आनंद पवार सहाय्यक कुलसचिव, श्री.एस.पी सोनकांबळे कक्ष अधिकारी ए.आर डी यांनी विशेष परिश्रम घेतले.