Home विदर्भ कोरोनात रंगला अनोखा ऑनलाईन विवाह सोहळा , “व-हाडी मंडळी सजली,...

कोरोनात रंगला अनोखा ऑनलाईन विवाह सोहळा , “व-हाडी मंडळी सजली, अन नाचली देखील ऑनलाईन”..!!

116

आईने प्रथम पार पाडली कोरोना ची जबाबदारी नंतर कौटुंबिक जबाबदारी…

सामाजिक कार्यकर्ते निखिल सायरे यांचा विवाह संपन्न

यवतमाळ , दि. २० :- सध्या जगभरात कोरोना विषाणुने थैमान घातले आहे. विविध देश या विषाणूचा सामना करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. याचेच अनुषंगाने सध्या सबंध भारतात लॉकडाऊन जाहीर केलेले आहे. यामुळे स्थानिक आरोग्य विभागातील कर्मचारी निशा सायरे यांचे चिरंजीव तथा सामाजिक कार्यकर्ते निखिल सायरे यांनी दिनांक १९ मे रोजी प्रस्तावित असलेला आपला विवाह सोहळा आपल्या मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पाडला. विशेष म्हणजे, यावेळी त्यांचे सर्वच नातेवाईकांनी नटुन थटुन ऑनलाईन विवाहाला हजेरी लावली इतकेच नव्हे तर लग्न लागल्यानंतर नाचली देखील!
कोरोना मुळे लग्न ठरलेल्या व होऊ घातलेल्या वर वधुंचा मोठा हिरमोड झाला होता. असे असतानाही सबंध राज्यभरातील वेगवेगळ्या चळवळीशी संबंधित असलेले सामाजिक कार्यकर्ते निखिल सायरे यांच्या कुटुंबीयांनी लॉकडाऊन मध्ये मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह पार पाडण्याची संकल्पना मांडली व पूर्ण देखील केली. लग्नास उपस्थित न राहु शकलेल्या सर्व नातेवाईकांकरीता विवाह ऑनलाईन पद्धतीने पार पडला. यावेळी सर्वच नातेवाईकांनी आपापल्या घरी राहून विवाहाचा आनंद लुटत नववर वधुंना शुभाशिर्वाद दिले.
आईने दोन्ही जबाबदा-या पार पाडल्या!
निखिल सायरे यांच्या आई निशा सायरे ह्या तालुका आरोग्य अधिकारी, यवतमाळ येथे कार्यरत आहे. कोरोना मुळे स्वत:च्या घरचे पहिले लग्न असतानाही संपूर्ण वेळ आपली शासकीय जबाबदारी पार पाडण्यात दिला. त्यांनी अगोदर शासकीय कर्तव्य व नंतर कौटुंबिक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडले.
या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्यानिमित्त करीता राज्यभरातील विविध सामाजिक नेते मंडळी, पदाधिकारी, मित्र परिवारांनी सायरे व नेवारे परीवाराला शुभाशिर्वाद दिले.