Home पर्यावरण पर्यावरण पूरक विकासाला प्राधान्य दिले पाहिजे,” ज्येष्ठ भूगोल अभ्यासक डॉ. टी. पी....

पर्यावरण पूरक विकासाला प्राधान्य दिले पाहिजे,” ज्येष्ठ भूगोल अभ्यासक डॉ. टी. पी. भोसले

354

मायणी – सतीश डोंगरे

सातारा , दि. २३ :- “हरित ग्रह परिणामामुळे वातावरणात घातक वायूंचे प्रमाण वाढू लागले आहे. एकूण वातावरणात ट्रेस गॅसेसचे प्रमाण १% इतके असावे लागते, ते११% झाले आहे. त्यामुळे ऋतूचक्रामध्ये मोठे फेरबदल घडू लागले आहेत. भविष्यात नैसर्गिक आपत्ती येऊ नयेत यासाठी आत्तापासूनच आपण पर्यावरण पूरक विकासाला प्राधान्य दिले पाहिजे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ भूगोल अभ्यासक डॉ. टी. पी. भोसले यांनी केले. ते येथील कला, वाणिज्य महाविद्यालयात भूगोल विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘जागतिक तापमान वाढ’ या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी होते.
प्रारंभी भूगोल विभाग प्रमुख प्रा. विकास कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ‘युवास्पंदन’ या भित्तिपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी दिग्दर्शक श्री. सुभाष हजारे, भित्तिपत्रक विभाग प्रमुख डॉ. शामसुंदर मिरजकर, डॉ. विजया कदम, प्रा. सविता भोसले, प्रा. शिवशंकर माळी, प्रा. मनोज डोंगरदिवे, प्रा. श्रीकांत कांबळे, प्रा. कालिदास सरकाळे, प्रा. दरेकर, प्रा. एस. डी. सपकाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
जागतिक तापमान वाढीमुळे जगभर पाणी पातळीत वाढ होण्याचीची भीती व्यक्त करून प्रा. शिंदे पुढे म्हणाले, “जगात अकरा युरोपीय विकसित देश जास्त प्रदूषण करणारे म्हणून ओळखले जातात. मात्र भारताचा दरडोई प्रदूषणाचा वेग या अकरा देशांपेक्षा जास्त आहे. जागतिक तापमानात वाढ झाल्याने दोन्ही ध्रुवांवरील बर्फ वितळण्याची प्रक्रिया वेगवान झाली आहे. त्यामुळे पाणी पातळीत वाढ होईल. परिणामी मालदीव सारखा देश समुद्रात बुडून जाईल. भारतातील मुंबई, कोची, मद्रास या महानगरांना समुद्राच्या वाढत्या पाणीपातळीचा धोका निर्माण होईल. यासाठी समाजजागृती गरजेची आहे. पर्यावरण पूरक जीवनशैली आत्मसात करणे ही काळाची गरज बनली आहे. अंधश्रद्धा व दिखाऊपणामुळे माणूस बेजबाबदार वर्तन करू लागला आहे. दरवर्षी भारतात 1.8 कोटी बालक जन्मतात. म्हणजेच दरवर्षी ऑस्ट्रेलिया देशाच्या लोकसंख्ये इतकी लोकसंख्या वाढ भारतात होते. या सर्व समस्यांचा शास्त्रीय भूमिकेतून अभ्यास करण्याची वेळ आलेली आहे.” आभार प्रदर्शन प्रा. स्वाती माळी यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. उत्तम टेंभरे यांनी केले.