Home विदर्भ महिला नेत्या नडल्या सुधीरभाऊंना भिडल्या….!

महिला नेत्या नडल्या सुधीरभाऊंना भिडल्या….!

46

राज्याचे वनमंत्री आणि भाजपाचे पराभूत लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार म्हणाल तर आमचे मित्र आहेत म्हणाल तर माझे आवडते मित्र आहेत, त्यांचे पाय कायम जमिनीवर असतात आणि ते सर्वांमध्ये अगदी सहज मिसळतात पण त्यांचेही इतर कायम सत्तेला चिकटून चिपकून बिलगून राहणाऱ्या नेत्यांसारखे आहे म्हणजे काही स्त्री पुरुष कसे खादाड असतात कि ते लग्नात पहिल्याच पंगतीला बसतात आणि शेवटच्या विहिणीच्या पंगतीला देखील जेवणावर ताव मारून मोकळे होतात, सुधीरभाऊंचे हे असेच आहे म्हणजे आत्ता ते खासदारकीला उभे होते पराभूत झाले याचा अर्थ यानंतर ते लगेच येणाऱ्या विधानसभेला उभे राहणार नाहीत असे अजिबात नाही तेथेही ते एखाद्या लहान मुलासारखे आधी उजवा हात पुढे करून प्रसाद घेतला कि पुन्हा डावा हात पुढे करतील आणि काहीही करून प्रसाद घेऊनच मोकळे होतील त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला शोभा फडणवीस सारख्या इतर कुठल्याही इच्छुक उत्सुक नेत्याचा दूरदूरपर्यंत भाजपा श्रेष्ठी अजिबात विचार करणार नाहीत, विधानसभेला देखील सुधीर मुनगंटीवार हेच भाजपा महायुतीचे उमेदवार असतील…

या लेखात मला काही प्रमाणात सुधीरभाऊंची काळी, पडती, पडकी बाजू येथे मांडायची आहे, त्यानंतरच्या एखाद्या भागात सुधीरभाऊ कसे भाजपाची ताकद आहेत किंवा मुख्यमंत्रीपदाचे उत्तम मटेरियल आहे तेही तुम्हाला नक्की सांगणार आहे किंबहुना सुधीर मुनगंटीवार यांच्या लोकसभेला झालेल्या पराभवामुळे राज्याच्या राजकारणातले संदर्भ कसे बदलले तेही येथे तुम्हाला सखोल सांगणार आहे, सुधीरभाऊंच्या पराभवाची नेमकी कारणे सांगायची झाल्यास त्यांना या निवडणुकीत दोन महिला नेत्या नडल्या त्यापैकी एक अर्थातच आमच्या दिवंगत मित्राची बाळू धानोरकर यांची पत्नी प्रतिभावहिनी ज्यांनी फार मोठ्या मताधिक्याने म्हणजे जवळपास दोन लाख साठ हजार एवढ्या प्रचंड फरकाने सुधीरभाऊंना चारी मुंड्या चीत केले, भाऊंच्या नाकातोंडात धूळ गेली, भाऊंनी अशी कोणती माती खाल्ली ज्यामुळे त्यांच्या नाकातोंडात धूळ गेली हेही मी यथावकाश तुम्हाला सांगणार आहेच किंबहुना मेहनती प्रामाणिक नेते कार्यकर्ते राहिले बाजूला आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या वीज खात्यात धुमाकूळ घालून सतत वीज मंडळाला लुटणार्या रणजितसिंग सलुजा छाप कंत्राटदार किंवा मुंबईपासून चंद्रपूर जिल्ह्या पर्यंत असलेले काही राजकीय दलाल जर उद्धट उर्मट भ्रष्ट व्यवहारी कार्यकर्त्यांच्या स्वरूपात कोंडाळे करून 24 तास श्रीमंती थाटात जमलेले असतील तर त्यांचे उलट परिणाम नेत्यांना नक्कीच भोगावे लागतात, भाऊंना भोगावे लागले, कंत्राटदार आणि दलालांपासून तातडीने फारकत न घेतल्यास हेच पराभवाचे वाईट परिणाम त्यांना विधानसभेला देखील नक्कीच भोगावे लागणार आहेत हे नक्की…

शोभाताई फडणवीस या 1995 दरम्यानच्या युति मंत्रिमंडळात अन्न आणि नागरी पुरवठा खात्याच्या मंत्री होत्या, त्या देवेन्द्रजींच्या सख्य्या काकू आहेत त्यांची चंद्रपूर जिल्ह्यातील मूल विधानसभा मतदार संघात आजही मोठी पकड आहे पण मुनगंटीवार यांनी त्यांचे राजकीय करिअर कायमस्वरूपी देशोधडीला लावले म्हणून त्या भाजपा नेत्या असूनही कायम सुधीरभाऊंवर दात ओठ खाऊन असतात, कारण ज्या चंद्रपूर विधानसभा मतदार संघातून सुधीरभाऊ विधानसभा लढवायचे तो आरक्षित झाल्याने भाऊंना आपले गाव सोडून दुसऱ्या गावात आसरा घ्यावा लागला त्यांनी शोभाताईंच्या मतदारसंघावर घाव घातला तेथून शोभाताईंना हुसकावून लावले आणि दाऊद पद्धतीने तेथे अवैध कबजा केला ज्यातून शोभाताई क्षुब्ध संतप्त झाल्या आणि सत्तेच्या राजकारणातून कायमस्वरूपी बाहेर फेकल्या गेल्या. वास्तविक त्यांच्यासाठी विधान परिषद भाऊंनी हक्काने मागून घ्यायला हवी होती पण सत्तेत उगाच स्पर्धा कशाला, सुधीरभाऊंनी शोभाताईंकडे कानाडोळा केला ज्यातून या लोकसभेला याच सुधीर मुनगंटीवार यांना आपल्याच विधानसभा मतदारसंघातून जवळपास 50 हजार मते कमी पडली कदाचित शोभाताईंनी जुना हिशेब चुकता केला याचा सरळ अर्थ असा कि ज्या विधानसभा मतदार संघातून भाऊंना मते कमी पडलेली आहेत त्याचे वाईट परिणाम त्यांना येत्या विधानसभेला हमखास भोगावे लागतील असे मी नाही तर स्थानिक नेते कार्यकर्ते त्यावर उघड बोलू लागले आहेत…

आता अत्यंत महत्वाचा मुद्दा खासदार प्रतिभा धानोरकर यांचा, अलीकडच्या काळात त्या केशरकाकू क्षीरसागर प्रतिभाताई पाटील शालिनीताई पाटील प्रेमलाकाकी चव्हाण मीनाक्षी पाटील मंदाताई म्हात्रे सरोज खापर्डे पद्धतीची महत्वाकांक्षी भारावून टाकणारी बुध्दीवान महापराक्रमी महिला नेत्या माझ्या पाहण्यात नव्हती, राज्याच्या राजकारणात अलीकडे स्वयंभू डॅशिंग अभ्यासू निश्चयी बहादूर हटके पद्धतीच्या महिला नेत्याची राज्याच्या राजकारणात मोठी वानवा होती, आमच्या दिवंगत मित्राच्या पत्नीने खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली हि दरी पोकळी भरून काढली, माझे हे वाक्य अधोरेखित करून ठेवा, महत्वाचे म्हणजे प्रतिभा बाळू धानोरकर यांच्या विजयाने यशोमती ठाकूर पद्धतीच्या महिला नेत्यांच्या स्थानावर आता आपोआप प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, निवडणुकीत सहज शक्य असतानाही फारसे पैसे खर्च न करता उत्तम नियोजनावर भर देत या महिलेने एका वाकबगार नेत्याच्या नाकात दम आणला भाऊंना पराभूत केले आणि एकाचवेळी अनेक तिर मारले म्हणजे सुधीरभाऊंना जसे राजकीय आव्हान दिले त्याचवेळी विजय वडेट्टीवार आणि शिवानी वडेट्टीवार या बाप लेकीचे विदर्भातले, जिल्ह्यातले, काँग्रेस मधले स्थान अडचणीत आणले, वास्तविक काँग्रेस श्रेष्ठींनी सुचविल्या नुसार जर स्वतः विजय वडेट्टीवार यांनी लोकसभा लढविली असती तर प्रतिभा धानोरकर विधानसभा मतदार संघापुरत्या मर्यादित राहिल्या असत्या पण वडेट्टीवार यांना अवदसा आठवली त्यांनी शिवानीच्या उमेदवारीसाठी हट्ट धरला आणि प्रतिभा यांना उमेदवारी मिळाली. जी कर्तबगार स्त्री बाळू सारख्या राजकीय डॉन असलेल्या नवऱ्याला अखेरपर्यंत खुबीने घरात देखील बाप आणि पती म्हणून बांधून ठेवते तिला हि लोकसभा जिंकणे केवळ डाव्या हाताचा मळ होता असे म्हटल्या जाते, मुनगंटीवार यांची उजवी बाजू देखील मला नक्की मांडायची आहे, सांगायची आहे…

तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी