Home मराठवाडा अखेर भाजपनेते किशनचंद तनवाणी – गजानन बारवाल शिवसेनेत , मातोश्रीवर बांधले शिवबंधन

अखेर भाजपनेते किशनचंद तनवाणी – गजानन बारवाल शिवसेनेत , मातोश्रीवर बांधले शिवबंधन

335

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. १९ :- महापालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी , माजी सभापती गजानन बारवाले यांनी आज दुपारी दोन वाजता मातोश्रीवर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी जिल्हा प्रमुख आ. अंबादास दानवे , आ. संजय सिरसाट , आ. प्रदीप जैस्वाल संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर यांची उपस्थिती होती. याबाबतचे वृत्तही सर्वप्रथम महानायक ऑनलाईनने दिले होते. या वृत्तानुसार आज अखेर शिवसेनेत पुनर्प्रवेश करून तनवाणी बारवाले पुन्हा स्वगृही परतले आहेत.दरम्यान महानायक ऑनलाईनशी बोलताना किशनचंद तनवाणी म्हणाले कि , भाजपमधील गटा -तटाच्या राजकारणाला कंटाळून आपण शिवसेनेत स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. लवकरच आपण आपल्यासोबत कोण कोण कार्यकर्ते येणार आहेत याची चाचपणी करून आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करून प्रवेश सोहळ्याचा कार्यक्रम घेणार आहोत. विशेष म्हणजे आ. अतुल सावे यांनी किशनचंद तनवाणी भाजप सोडून जाणार नाहीत असे म्हटले होते परंतु तनवाणी आणि बारवाल यांनी अखेर भाजपला सोडचिट्ठी देऊन मोठा दणका दिला आहे.औरंगाबाद महापालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी शरहाध्यक्ष किशनचंद तनवाणी हे समर्थक नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. भाजपच्या शहराध्यक्ष निवडीवरून ते काही दिवसांपासून नाराज होते. मुळचे शिवसैनिक असलेले तनवाणी यांनी काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आपल्याला डावललं जातंय असं वाटल्याने त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत ६ ते ७ समर्थक नगरसेवकही शिवसेनेत प्रवेश करीत आहेत.ठरल्याप्रमाणे आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर तनवाणी-बारवाल , बाळासाहेब गायकवाड यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या हस्ते शिवबंधन बांधून प्रवेश घेतला. या दोघांच्याही शिवसेनेत परतण्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा हादरा बसणार हे नक्की. औरंगाबाद महापालिकेत गेली अनेक वर्ष शिवसेना आणि भाजप महायुतीची सत्ता होती परंतु राज्यातील महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर भाजप-सेना युती संपुष्टात आल्यामुळे भाजप एकाकी पडली आहे. दरम्यान जुने शिवसैनिक शिवसेनेत परतल्यामुळे पुन्हा औरंगाबाद शहरात सेनेची ताकद वाढणार असल्याचे चित्र आहे. निवडणुकीआधीच आपली ताकद वाढविण्यासाठी शिवसेनेने नाराज तनवाणींना आपल्याकडे वळवलं आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्याने त्याचा फायदा शिवसेनाला झाला आहे.दरम्यान यावर आपली प्रतिक्रिया देताना भाजप शहर अध्यक्ष संजय केणेकर यांनी मात्र किशनचंद तनवाणी यांच्या जाण्याने भाजपला काहीही फरक पडणार नाही, असा दावा केला आहे. भाजप हा विशाल समुद्र आहे. होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत विकासासाठी जनता निश्चितपणे भाजपला साथ देईल, असा विश्वास केणेकर यांनी व्यक्त केला.