Home मराठवाडा तीन गावठी कट्ट्यासह अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकला

तीन गावठी कट्ट्यासह अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकला

170

ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांची कारवाई…!!

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. १९ :- गावठी बनावटीचे तीन रिव्हॉल्वर घेवून सिल्लोडकडे जात असलेल्या अट्टल गुन्हेगारास सापळा रचून ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी गजाआड केले. ही कारवाई बुधवारी (दि.१९) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास डोंगरगाव शिवारातील हॉटेल रविराज समोर करण्यात आली. संतराम उर्फ संतोष अंकुश सावंत (वय ३६, रा.सुरेशनगर, ता.नेवासा, जि.अहमदनगर,हमु. उरूळी-देवाची, जि.पुणे) असे आरोपीचे नाव असून त्याच्या ताब्यातून ३ गावठी रिव्हॉल्वर, ११ जीवंत काडतूसे, एक दुचाकी असा एकूण २ लाख ३ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शिवजयंतीनिमित्ताने ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक डोंगरगाव शिवारात गस्तीवर होते. ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांना एक जण तीन गावठी रिव्हॉल्वर आणि ११ जीवंत काडतूसे घेवून दुचाकीवर सिल्लोडकडे जात असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक भगतसिंह दुलत, सहाय्यक फौजदार सुधाकर दौड,जमादार गणेश मुळे, विठ्ठल राख, नामदेव शिरसाट, संजय देवरे, उमेश बकले, योगेश तरमळे, सिल्लोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक किरण बिडवे, जमादार विलास सोनवणे आदींनी डोंगरगाव शिवारात सापळा रचला होता.

दुचाकी क्रमांक (एमएच-१२-जेजे-४५६७) वर जाणार्‍या संतराम उर्फ संतोष सावंत याला अडवून पोलिसांनी चौकशी केली असता, तो उडवा उडवीची उत्तरे देत होता. पोलिसांनी खाक्या दाखवून त्याची झडती घेतली असता दुचाकीच्या डिक्कीतून तीन गावठी रिव्हॉल्वर, ११ जीवंत काडतूसे आदी मिळून आले. याप्रकरणी सिल्लोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील, अप्पर अधिक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.