Home सातारा युवकांनी आपले जगणे, आपले अनुभव कथा कवितांच्या माध्यमातून व्यक्त करावेत. त्यामुळे चालू...

युवकांनी आपले जगणे, आपले अनुभव कथा कवितांच्या माध्यमातून व्यक्त करावेत. त्यामुळे चालू पिढीच्या अनेक समस्यांना वाचा फुटेल,” – ज्येष्ठ लेखिका नीलम माणगावे

175

मायणी – सतीश डोंगरे

सातारा , दि. १६ :- “ग्रामीण जीवनात अनेक चढ-उतारांनी भरलेले समृद्ध अनुभवविश्व असते. त्यामुळे लिहिणाऱ्यांना मोठा अवकाश प्राप्त होतो. युवकांनी आपले जगणे, आपले अनुभव कथा कवितांच्या माध्यमातून व्यक्त करावेत. त्यामुळे चालू पिढीच्या अनेक समस्यांना वाचा फुटेल,” असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका नीलम माणगावे यांनी केले. त्या येथील कला, वाणिज्य महाविद्यालयाने अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत आयोजित केलेल्या बाराव्या युवा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा म्हणून बोलत होत्या. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन सुरेंद्र गुदगे होते. संमेलनाचे उद्घाटक सुधाकर कुबेर, संचालक दिगंबर पिटके, कवयित्री अस्मिता इनामदार, डॉ. विजया पवार, भाऊसाहेब लादे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
दिवसेंदिवस स्त्रियांवरील अत्याचारांमध्ये वाढ होत आहे, याचा संदर्भ देऊन संमेलनाध्यक्षा नीलम माणगावे पुढे म्हणाल्या, “बाई म्हणजे फक्त शरीर नव्हे. तिचे व्यक्तिमत्त्व, तिचे विचार, तिने घरासाठी खाल्लेल्या खस्ता, तिचे मातृत्व, मुलांचे संगोपन, वडीलधाऱ्यांचा सांभाळ या सगळ्या गोष्टी म्हणजे बाई आहे. बाईवर प्रेम करणे म्हणजे फक्त तिच्या लैंगिक अवयवांवर प्रेम करणे किंवा मालकी हक्क सांगणे नव्हे. तिच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाला अवकाश प्राप्त करून देणे, तिच्या विचार व भावनांना समजून घेणे, म्हणजे तिच्यावर प्रेम करणे आहे. स्त्रीच्या प्रगती आड नेहमीच पुरुष प्रधान संस्कृती येत असते. अनेक वेळेला धार्मिक परंपरा पुढे करून तिच्या प्रगतीच्या वाटा रोखल्या जातात. म्हणूनच मी एका कवितेत लिहिले आहे,
प्रकाशाच्या वाटेवर नको राहू देवा
हो जरा बाजूला मला उजेड हवा
हा उजेड शिक्षणाच्या, ज्ञानाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतो. परंतु आज उच्चशिक्षण घेऊनही अनेकांची मती मातीमोल झाली आहे. वित्ताची तहाण वाढली आहे. माणुसकी हरवू लागली आहे. आज अनेकांकडे मोठा मुद्दा आहे, पण त्या हुद्यावरील माणूस मात्र खूप लहान आहे. मी एकदा मॉरेशिसमध्ये समुद्रात पॅराग्लायडिंग करत असताना क्षणभर माझ्या मनात मृत्यूची भीती चमकून गेली. त्याच वेळी माझ्या शेजारी बसलेली उत्तर भारतातील एक कवयित्री मैत्रीण मला म्हणाली, तुमची जात कोणती? आपण भारताचे प्रतिनिधी म्हणून परदेशात गेल्यानंतरही आपल्या मनातील ‘जात’ जात नसेल तर उच्च शिक्षणाचा, उच्च पदाचा उपयोग काय? आज बहुजन समाज आणि स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवत आहेत. त्याच्या मुळाशी फुले-शाहू-आंबेडकर-कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेले कार्य आहे. विभागीय पातळीवर होणारी छोटी-छोटी संमेलने म्हणजे ग्रामीण लेखक-कवींना मिळणारे मुक्त विचारपीठ आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. वाचन संस्कृती वाढवावी. तरच समाजातील भेदाभेद आणि अविश्वास कमी होईल. ”
स्वागताध्यक्ष सुरेंद्र गुदगे म्हणाले, “गेली १२ वर्षे हे संमेलन सातत्य टिकवून चालू आहे. या संमेलनातून अनेक विद्यार्थी घडले, लेखक-कवी घडले, याचा आम्हाला अभिमान आहे. लेखक कवींच्या विचारांच्या स्वातंत्र्याचे आम्ही स्वागतच करतो. कारण ते दूरदृष्टीने परखड सत्य मांडत असतात.”
संमेलनाचे उद्घाटक सुधाकर कुबेर म्हणाले, “साहित्य संमेलन ग्रामीण विभागात भरविले जात असल्यामुळे या साहित्यात ग्रामसंस्कृतीचे दर्शन घडते. ग्रामीण भागाला नव्या विचारांची ओळख होते. अनेक समस्यांवर संमेलनांमधून विचारमंथन झाले पाहिजे.”
संमेलनाचे समन्वयक डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांनी संमेलनामागील भूमिका स्पष्ट केली. प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी यांनी प्रास्ताविक केले. वाङमय मंडळाचे प्रमुख डॉ. शौकतअली सय्यद यांनी आभार मानले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजया कदम व प्रा. शिवशंकर माळी यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, नवोदित लेखक, कवी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्रांगणात ग्रंथप्रदर्शन घेण्यात आले होते.