नात्याला काळिमा फासणारी घटना
अमीन शाह
नागपूर , दि. ११ :- जीवे मारण्याची धमकी देत २२ वर्षीय नराधमानं त्याच्या १५ वर्षांच्या पुतणीवर अत्याचार केल्याची घटना कन्हान भागात घडली आहे. काकाच्या लैंगिक अत्याचारामुळं पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिच्या आईनं पोलिसांत तक्रार केली. या प्रकरणातील आरोपी पसार असून त्याचा शोध सुरू आहे. या घटनेनं सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
अतुल असं आरोपीचं नाव असून तो २२ वर्षांचा आहे. तो पीडितेच्या वडिलांचा चुलत भाऊ आहे. तो पीडितेच्या घराशेजारी राहायचा. नात्यातीलच असल्यानं घरच्यांना कधीही त्याच्यावर संशय आला नाही. मात्र, त्यानं नात्याला काळीमा फासला. पीडितेचे आईवडील कामानिमित्त बाहेर असताना पीडितेला घरी एकटी गाठून आरोपीनं मागील वर्षी सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान तिच्यावर वारंवार अत्याचार केले. कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली.
अलीकडंच पीडितेला पोटाचा त्रास व्हायला सुरुवात झाली. त्यामुळं आईनं ३ फेब्रुवारी रोजी तिला कन्हान येथील खासगी रुग्णालयात तपासणीसाठी नेले. त्यावेळी मुलगी गर्भवती असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळं पीडितेचं कुटुंब हादरून गेलं. पीडितेला विचारणा केली असता तिनं काका अतुल याचं नाव सांगितलं. कुटुंबातीलच असल्यानं आरोपीच्या बाजूनं प्रकरण आपसात मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, १० फेब्रुवारीला पीडितेच्या कुटुंबीयांकडून कन्हान पोलिसात रीतसर तक्रार दाखल करून कठोर शिक्षेची मागणी करण्यात आली. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.