Home पश्चिम महाराष्ट्र स्वतःच्या आयुष्याचा जोडीदार निवडताना विवेकी दृष्टिकोनाचा वापर केला पाहिजे – अमृता जाधव

स्वतःच्या आयुष्याचा जोडीदार निवडताना विवेकी दृष्टिकोनाचा वापर केला पाहिजे – अमृता जाधव

377

मायणी – सतीश डोंगरे

सातारा , दि. ०४ :- “विवाहाचा निर्णय हा भावनेच्या भरात किंवा कोणत्याही दबावाला, आमिषाला बळी पडून घेता कामा नये. प्रत्येकाने स्वतःच्या आयुष्याचा जोडीदार निवडताना विवेकी दृष्टिकोनाचा वापर केला पाहिजे. लग्न जुळवताना कुंडली किंवा ज्योतिष याचा उपयोग करणे हे अंधश्रद्धेचे आहे.

त्यापेक्षा जोडीदाराचे विचार, सामाजिक व आर्थिक स्थिती, तसेच शारीरिक अनुरूपता तपासणे महत्त्वाचे आहे.” असे प्रतिपादन मोहिनी फाउंडेशनच्या समन्वयक अमृता जाधव यांनी केले. त्या येथील कला, वाणिज्य महाविद्यालयात विवेक वाहिनी व राष्ट्रीय सेवा योजना विभागाने आयोजित केलेल्या ‘जोडीदाराची विवेकी निवड’ या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी हे होते.
प्रारंभी विवेक वाहिनीच्या प्रमुख डॉ. विजया कदम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी कु. कोमल माळी, वैभव चव्हाण यांची मनोगते झाली. याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोशल मीडियाचे व्यवस्थापक हर्शल जाधव, प्रा. शिवशंकर माळी, प्रा. सारिका कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
तारुण्यातील आकर्षणाला प्रेम समजण्याची चूक करू नये, हे स्पष्ट करताना अमृता जाधव पुढे म्हणाल्या, “खरे प्रेम हे सहवासातून निर्माण होते. समान विचार व समान आवडीनिवडी हा खऱ्या प्रेमाचा पाया असतो. खरे प्रेम आंतरिक ओढीतून निर्माण झालेले असल्यामुळे दीर्घकाळ टिकते. म्हणूनच युवकांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तयार केलेल्या आधुनिक कुंडलीचा वापर करून आपला जोडीदार निवडावा.”
यावेळी बोलताना हर्षल जाधव म्हणाले, “जोडीदाराच्या भावनांचा आदर करण्याची प्रवृत्ती वाढीस लागली पाहिजे. प्रेम म्हणजे शब्दांचे बुडबुडे नव्हेत. तर प्रेम करणे म्हणजे जोडीदाराचे सुख दुःख वाटून घेणे होय. माणसाची किंमत त्याच्याकडे असणारा पैसा किंवा त्याचे करियर यावर होऊ शकत नाही, तर त्याचे अंगभूत गुणच त्याची खरी पात्रता दर्शवितात. ज्याची विचारसरणी चांगली आणि स्त्री-पुरुष संबंधातील दृष्टिकोन निकोप तोच चांगला जोडीदार होऊ शकतो. शारीरिक-मानसिक, बौद्धिक, लैंगिक सुदृढता विवाहाला यशस्वी बनविते. आपला जोडीदार निर्व्यसनी किंवा संसर्गजन्य आजारांना बळी पडलेला नाही ना, याची खात्री करण्यासाठी आरोग्य तपासणी करणे, ही काळाची गरज बनली आहे.”
या कार्यशाळेत विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उस्फूर्तपणे चर्चा केली. आपली मते व्यक्त केली व प्रश्नोत्तरात सहभाग घेतला. ध्वनीचित्रफितीच्या साहायाने विद्यार्थ्यांचे शंकासमाधान करण्यात आले. आभार प्रदर्शन प्रा. विकास कांबळे यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. उत्तम टेंबरे यांनी केले.