Home महत्वाची बातमी घाटंजी तालुक्यातील मानुसधरी ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार व भ्रष्टाचार..!

घाटंजी तालुक्यातील मानुसधरी ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार व भ्रष्टाचार..!

253

➡️ जिल्हा परिषदेच्या सक्षम व वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत वा चौकशी समिती गठीत करुन सखोल चौकशी करण्याची मागणी..!

( अयनुद्दीन सोलंकी )
————————-
घाटंजी : तालुक्यातील आदिवासी बहुल पेसा असलेल्या माणुसधरी ग्रामपंचायती मध्ये विकास कामाच्या नावावर अनेक योजनेतील निधीतून धातुर मातुर कामे करून जास्तीत जास्त पैशाचा गैरप्रकार केल्या जात असून खनिकर्म विभागाकडून प्राप्त निधीतून निकृष्ट दर्जाचे साहित्य खरेदी केले असून माणुसधरी ग्रामपंचायत भ्रष्टाचाराचे कुरण बनले की काय? असे वास्तव निर्माण झाले आहे. या बाबतची लेखी तक्रार ग्रामपंचायत सदस्य भारत आडे, अन्नपुर्णा पेंदोर, तंटामुक्ती गांव समितीचे अध्यक्ष मडावी व सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद पेंदोर आदींनी जिल्हाधिकारी यवतमाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सोनाली माडकर आदीं कडे दाखल करण्यात आली आहे.

सदर प्रकरणाची जिल्हा परिषदेच्या सक्षम व वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत वा चौकशी समिती गठीत करुन सखोल चौकशी करुन दोषी विरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणी, मानुसधरी येथील प्रल्हाद पेंदोर व गावकऱ्यांनी केली आहे. विशेषतः सदर प्रकरणात दोषी विरुद्ध नियमानुसार तात्काळ फौजदारी कारवाई करण्यात आली नाही तर सदर प्रकरणात वि. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात येत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद पेंदोर यांनी दिली आहे.

घाटंजी तालुक्यातील माणुसघरी ग्रामपंचायत अंतर्गत आदिवासी बहुल जनता वास्तव्यास असून, येथील गांव पेसा अंतर्गत आहे. सरपंच व उपसरपंच यांचे पती जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेवून या ग्रामपंचायत मधील निधीचा कुणालाही विश्वासात न घेता, ग्राम सचिव यांना हाताशी धरून ग्रामपंचायतला शासनाकडुन मिळालेल्या निधीचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात येत आहे.सदर निधी मानुसधरी गावाच्या विकासा करीता न वापरता स्वतःच्या आर्थीक लाभाकरीता उपयोग करीत आहे, असे खात्रिलायक रित्या समजते. त्यामध्ये सदरच्या निधीचा समावेश आहे.

खनिकर्म विभागाकडून ग्रामपंचायत माणुसधरी ग्रामपंचायतीला २५ लक्ष रुपयाचा निधी प्राप्त झाला होता. परंतु; सदर निधी हा गावातील ग्रामसभा वा मासिक सभेमध्ये ठराव न घेता बोगस ठराव घेऊन तो रस्त्याच्या कामासाठी वापरला आहे, असा आरोप होत आहे. या मागील हेतु, सदर गावातील रस्ता तयार करतांना या निधीतुन त्यांना जास्तीचा आर्थीक लाभ करण्यात आला आहे. सदर रस्ता हा कुठलेही खोदकाम न करता रस्ता तयार केला आहे. त्यामुळे इथे सुध्दा त्यांनी स्वतःच्या आर्थीक लाभाकरीता निधीचा गैरवापर केला आहे. तसेच खनीकर्म विभागाकडुन प्राप्त निधीतून गावांकरीता आरो मशीन (WATER ATM) कुणालाही विश्वासात न घेता तसेच बोगस ठराव घेवून परस्पर बसविण्यात आलेली आहे.

सदर खनिकर्म विभागाच्या निधीचा पदभार हा तत्कालीन ग्रामपंचायत सचिव गुल्हाने यांचेकडे असुन, नविन ग्रामपंचायत सचिव मालखेडे यांनी नविन खाते उघडुन सदर निधीचा मोठ्या प्रमाणात घोळ केलेला आहे. १४ वा वित्त आयोग व १५ वा वित्त आयोगाच्या निधीमध्ये फार मोठ्या प्रमाणात अफरातफर करण्यात आलेली आहे. सदर दोन्ही आयोगातील निधी सन २०२१ – २२ व २०२२ – २३ या दोन्ही आर्थीक वर्षातील निधीची सखोल चौकशी करण्यासाठी एक चौकशी समिती स्थापन करून योग्य ती चौकशी करुन दोषी विरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद पेंदोर व मानुसधरी येथील नागरिकांनी शासनाकडे केली आहे.

ठक्कर बाप्पा योजनेतून प्राप्त निधीची सन २०२१ – २२ व २०२२ – २३ ची सुद्धा सखोल चौकशी करण्यात यावी. यात सुध्दा मोठ्या प्रमाणात निधीचा गैरवापर व भ्रष्टाचार झालेला आहे.

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामातही गैरप्रकार करण्यात आले असून सदर कामाची सुध्दा सखोल चौकशी करुन दोषी विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. माणुसरी येथील आमसेवक हे फक्त मासिक सभे शिवाय इतर कधीही गावात येत नसल्याचा आरोप मानुसधरी येथील गावकऱ्यांनी शासनाकडे लेखी तक्रारीतुन केला आहे.

घाटंजी तालुक्यातील मानुसधरी ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामपंचायत सचिव यांचे कडे कोणतेही अभिलेख उपलब्ध नसुन पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे.

माणूसघरी गावात दोन वर्षापासून एकही ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली नाही. तसेच मागील चार ते पांच महिन्यापासून मासिक सभा सुध्दा आयोजित करण्यात आलेली नाही. तसेच दोन वर्षांपासून एकही महिला सभा झालेली नाही. मानुसधरी येथील कर भाडे पट्टी वसुल करुन स्वतः वापरत आहे, असा आरोप होत आहे. तरी कर भाडे पट्टीची सुद्धा चौकशी समिती मार्फत योग्य ती चौकशी करण्यात यावी व ग्रामपंचायतमधील कारभाराची चौकशी समिती स्थापन करुन सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तक्रारीच्या प्रति जिल्हाधिकारी यवतमाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सोनाली माडकर आदीं कडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असुन त्यावर ग्रामपंचायत सदस्य भारत आडे, अन्नपुर्णा पेंदोर, तंटामुक्ती गांव समितीचे अध्यक्ष मडावी व सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद पेंदोर आदींच्या सह्या आहेत.