Home यवतमाळ वाघाडी नदी येथे महाश्रमदान शिबीर “यवतमाळकरांची नववर्ष सुरुवात सेवासंस्काराने”

वाघाडी नदी येथे महाश्रमदान शिबीर “यवतमाळकरांची नववर्ष सुरुवात सेवासंस्काराने”

192

प्रशासन, संस्था, संघटना, पर्यावरण स्नेहींचा पुढाकार

यवतमाळ (प्रतिनिधी) शासनाच्या सहकार्याने पर्यावरण संरक्षण समिती तथा पर्यावरण स्नेही संस्थांच्या वतीने १ जानेवारी २०२३ ला सकाळी ७ वाजता वाघाडी येथे महाश्रमदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन याद्वारे यवतमाळकरांच्या नववर्षाची सुरुवात ही सेवा संस्काराने होणार आहे.
स्वच्छ सुंदर वाघाडी अभियान अंतर्गत वाघाडी नदीच्या वडगाव रोडवरील गुरुद्वाराजवळील उगमस्थानापासुन पर्यावरण संरक्षण समिती, यवतमाळ प्लॉगर, जनसेवा फाउंडेशन, टीडब्ल्युजे फाउंडेशन, बी काईंड या संस्थांची १६ आठवड्यांपासुन पर्यावरणपुरक सेवाकार्ये सुरु आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त शासनाच्या सांस्कृतिक व पर्यटन विभागांतर्गत राज्यात चला जाणुया नदीला या उपक्रमाला २ ऑक्टोबरपासुन वर्धेतुन सुरुवात झाली. या अभियानात यवतमाळ जिल्ह्यातील वाघाडी नदीचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली. यास सकारात्मक दाद देत माजी मंत्री श्री. मदन येरावार आणि जिल्हाधिकारी श्री. अमोल येडगे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत वाघाडी नदीला या अभियानात समाविष्ट केले. राज्याचे वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते वाघाडी येथे जलपुजन होऊन माजीमंत्री श्री. मदन येरावार आणि खासदार भावनाताई गवळी यांचे उपस्थितीत जल व जनजागृती मोहीमेचा शुभारंभ झाला. यानंतर उपवनसंरक्षक आणि जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या अनुक्रमे झालेल्या आढावा आणि नियोजन बैठकीनंतर महाश्रमदान शिबीरासाठीचे प्रयत्न प्रशासन आणि संस्थांच्या माध्यमातुन सुरु झाले.
प्रशासन, संस्था, संघटना, विद्यार्थी आदी समस्त यवतमाळकरांच्या नववर्षाचा शुभारंभ सेवा संस्काराने होण्यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी वाघाडी परिसरात कचरा निर्मुलन, प्लास्टीकमुक्त मोहीम, नदीतील स्वच्छता, वृक्षारोपण, सौदर्यीकरण, छोटे बंधारे निर्मीती, परिसर सफाई, निर्माल्य व्यवस्थापन, नदीतील मुर्तींचे विघटन, जनजागृतीपर मार्गदर्शन आदी पर्यावरणपुरक उपक्रम होणार आहेत. या शिबीरात नगर परिषद प्रशासनाने विशेष पुढाकार घेतला आहे.
यवतमाळचा वारसा असलेल्या तसेच पुढे निळोणा, चापडोह, वागद नदीचा भाग असलेल्या वाघाडी नदीला सर्व प्रकारच्या प्रदुषणापासुन वाचविण्यासाठी तसेच परिक्रमा करुन वाघाडीच्या पुनरुज्जीवनासाठी संस्था, संघटनांनी पुढाकार घेऊन प्रत्येक पर्यावरण स्नेही यवतमाळकरांनी आवर्जुन महाश्रमदानाला उपस्थित राहावयाचे आवाहन आयोजकांनी केले आहे.