Home जळगाव प्रजासत्ताक दिनी जवान फौंडेशनतर्फे “अशफाकराम” या एकपात्री नाटकाचे दिमाखात सादरीकरण

प्रजासत्ताक दिनी जवान फौंडेशनतर्फे “अशफाकराम” या एकपात्री नाटकाचे दिमाखात सादरीकरण

226

शरीफ शेख – रावेर

जळगाव , दि. २८ :- येथील प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जवान फौंडेशनतर्फे राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित एकपात्री नाटकाचा प्रयोग रविवारी २६ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता शहरातील बालगंधर्व खुले नाट्यगृहात सादर करण्यात आला.
विमर्श मुंबई प्रस्तुत “अशफाकराम” महान क्रांतिकारक शहीद रामप्रसाद ‘बिस्मिल’ आणि शहीद अशफाक उल्लाह खान यांच्या जीवन व कार्यावर आधारित एकपात्री नाटकाचे लेखक सुधीर विद्यार्थी हे होते तर संपादन, दिग्दर्शन व एकपात्री अभिनय मनीष मुनी यांनी अत्यंत ताकदीने सादर केला.

आज जसे की, जात, धर्म, भाषा ,प्रांत या विविध भावनिक मुद्द्यांवर राजकारण केले जात असून देशातील हिंदू-मुस्लिम ऐक्याची उज्ज्वल परंपरा धोक्यात आली आहे. हे नाटक काकोरी घटनेचे अमर शहीद राम प्रसाद बिस्मिल आणि अशफाक उल्ला खान यांच्या घनिष्ठ मैत्रीचे कंगोरे उलगडून दाखवत आजच्या आव्हानांशी थेटपणे मुकाबला करण्यासाठी तसेच धार्मिक, जातीय आणि भाषिक ऐक्यावर जोर देते. नाट्यकर्मी मनीष मुनी यांनी या नाटकातून सामाजिक व जातीय सलोखा, बंधुता आणि राष्ट्रीय ऐक्याचा संदेश अतिशय मार्मिक पद्धतीने सांगितला. काकोरी घटनेच्या माध्यमातून त्यांनी तत्कालीन क्रांतिकारकांचे जीवन, आदर्श,मूल्ये, वैचारिक संघर्ष असे प्रसंग, संवाद आणि पात्रांच्या माध्यमातून उभे केले. राम प्रसाद बिस्मिल आणि अशफाक यांच्या आपापसातील संवादांमधून प्रेम,आपुलकी व देशप्रेम या भावना नाटककारांनी जिवंत केल्या .अशफाक आणि बिस्मिलची निखळ मैत्री आणि देश प्रेमाची भावना प्रेक्षकांनी वेगवेगळ्या प्रसंगाच्या माध्यमातून अनुभवली. नाटकाचा शेवटही अत्यंत मार्मिक होता. अशफाक यांचे आईला पत्र. त्या पत्रात मुलगा अशफाक याच्या आईबरोबर झालेल्या संवादातून प्रेक्षकांचे डोळे पाणावले. साधारण ऐंशी मिनिटांच्या या सातत्यपूर्ण सादरीकरणाने प्रेक्षक अक्षरशः भारावून गेले होते. तसेच यादरम्यान अनेक हृदयस्पर्शी प्रसंग पाहिल्यानंतर प्रेक्षक स्तब्ध झाले होते. नाटकाच्या शेवटी प्रेक्षकांनी उभे राहून अभिनेता आणि दिग्दर्शक मनीष मुनी यांचे टाळ्यांचा गजरात जोरदार कौतुक केले. हे भावप्रवण नाटक थेट प्रेक्षकांच्या अंतःकरणात उतरले. हा त्यांचा टाळ्यांचा कडकडाट बराच काळ सांगत होता. अशा प्रकारे नाटक आजच्या संदर्भात एक नवीन दृष्टी व दृष्टिकोन देते.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . आमदार राजुमामा भोळे, सैनिक कल्याण अधिकारी वाकडे,जळगाव जिल्हा जागृत जनमंचचे शिवराम पाटील,बहुजन क्रांती मोर्चाचे मुकुंद सपकाळे,जवान फौंडेशनचे पवार,जनसंग्रामचे विवेक ठाकरे,ऍड. शिरिन अमरेलीवाला, लेखिका वैशाली पाटील,कादरिया फौंडेशनचे फारुक कादरी,मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे कॉम्रेड प्रकाश चौधरी, सत्यशोधक साहित्य परिषदेचे जयसिंग वाघ,मराठा छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, वंचित बहुजन आघाडीचे गुरुनाथ सैदाणे, किरण भामरे, वैशाली झालटे या उपस्थित मान्यवरांचे आयोजक जवान फौंडेशनचे अध्यक्ष माजी सैनिक ईश्वर मोरे व सामाजिक कार्यकर्ते अशफाक पिंजारी यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत व सत्कार केले.
नाट्य प्रयोगाची माहिती कॉम्रेड सुबोध मोरे यांनी दिली तर प्रास्ताविक ईश्वर मोरे आणि आभारप्रदर्शन अशफाक पिंजारी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल मोरे,राकेश वाघ व परशुराम साळुंखे यांनी परिश्रम घेतले.