Home मराठवाडा संविधान विरोधी कायद्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस लढा उभारणार – शिवाजीराव जाधव

संविधान विरोधी कायद्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस लढा उभारणार – शिवाजीराव जाधव

199

संविधान बचाव सर्वपक्षीय महाधरणे आंदोलनात प्रतिपादन….!

मुखेड – मुस्तफा पिंजारी

नांदेड , दि. २० :- देशातील केंद्र सरकार सर्व बाबतीत अपयशी ठरत आहे. आपले अपयश लपविण्यासाठी देशात धार्मिक तेढ निर्माण करुन त्याचे भांडवल करित आहे. भारतीय संविधानाच्या धर्मनिरपेक्ष मुल्यांना पायदळी तुडविण्याचे काम केंद्रातील भाजप सरकार करीत आहे. सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एन.पी.आर.) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा (एनआरसी) च्या माध्यमातून देशात अराजकता माजविण्याचे षडयंत्र सर्व संविधानप्रेमी नागरिकांनी हाणून पाडले पाहिजे. असे आवाहन करत संविधान विरोधी कायद्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लढा उभारणार असल्याचे प्रतिपादन तालुकाध्यक्ष शिवाजीराव जाधव उमरदरीकर यांनी केले.
तहसील कार्यालयासमोर संविधान बचाव सर्वपक्षीय आंदोलनाच्या वतीने सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एन.पी.आर.) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा (एनआरसी) विरोधात शनिवारी (दि.१८) रोजी महाधरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी सभेला संबोधित करतांना ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे होते.
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारुक अहमद म्हणाले कि, देश आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. देशातील तरुणांचं भविष्य सुरक्षित नाही. देश हा अराजकतेच्या वाटेवर आहे. बँकेतले पैसे सुरक्षित नाहीत. अशा स्थितीत या देशाला सरकार दारुड्यासारखं चालवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, की एनआरसी देशभरात लागू करण्याबाबत निर्णय झालाच नाही, पण हे साफ खोटं आहे. गृहमंत्री अमित शहांनी संसदेत व मिडीयात एन.आर.सी. संपूर्ण देशात लागू करणार असल्याचे सांगितले आहे. नागरिकत्व कायदा केवळ मुस्लिमांनाच लागू होतो हा भाजप-संघाचा प्रचार खोटा आहे. या कायद्यामुळे ४० टक्के हिंदूही भरडले जाणार आहेत. शिवाय अन्य आदिवासी भटक्या, जातींनाही याचा फटका बसणार आहे. म्हणून जो पर्यंत संविधान विरोधी कायदा सरकार माघार घेत नाही तोपर्यंत आंदोलने सुरुच राहणार असल्याचे सांगितले. तालुक्यात पहिल्यांदाच मुस्लिम महिला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या. आंदोलनात व्याख्याते मधूकर महाराज बारुळकर, मुफ्ती इस्माईल कासमी, मौलाना अजीम रजवी, हाफिज अब्दुल गफार, हाफिज माजीदसाब, काॅ.बळवंत मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव, विठ्ठलराव इंगळे, काँग्रेस प्रवक्ता दिलीप कोडगीरे, वडार समाज नेते श्रावण रॅपनवाड, युवा नेते राहूल लोहबंदे, शिवाजी गेडेवाड, मराठा सेवा संघाचे सदाशिवराव पाटील, शौकत खां पठाण, जब्बार चांडोळकर, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष बालाजी पा.सांगवीकर, युवक काँग्रेसचे डाॅ.रणजीत काळे, किरण पा.जाहूरकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे काॅ.विनोद गोविंदवार, काॅ.मंजुश्री कबाडे, भाकपाचे बालाजी लंगेवाड, अभिवक्ता संघाचे अॅड.गोविंद डुमणे, अॅड.अस्लम शेख, अॅॅड. रहिम खान, अहेेेेमद बेळीकर, माजी नगरसेवक हैदर परदेसी, सय्यद शमशोद्दीन, महमदसाब यांच्यासह हजारो नागरिक सहभागी झाले होते. ग्रामीण भागातील हजारो नागरीकांचा मोठा सहभाग दिसला. पोलिस उप अधिक्षक रमेश सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. भाऊसाहेब मगरे, पि.एस.आय. चित्ते यांनी चौख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

चौकट :

याआंदोलनात मुस्लिम महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. धरणे आंदोलन साडे चार तास सुरु होते. आंदोलना दरम्यान वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी संविधान बचाव सर्वपक्षीय आंदोलनात सहभागी सर्व स्वंयसेवकांनी परिश्रम घेतले. आंदोलनानंतर पोलिस बांधवांचे आभार मानत परिसराची स्वच्छता केली. महाधरणे आंदोलन शांततेत पार पडले.