Home बुलडाणा नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या जाहिरातीला बळी पडू नये नागरिकांत संभ्रम निर्माण केल्याचे...

नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या जाहिरातीला बळी पडू नये नागरिकांत संभ्रम निर्माण केल्याचे दिसून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल : अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे

31
0

देऊळगाव राजा:- रवि आण्णा जाधव

कोरोनासंदर्भांत शासन व्यापक प्रमाणात जनजागृती करीत असतांना विविध वस्तुंची निर्मिती करणारे काही उत्पादक आणि जाहिरातदार विशिष्ट प्रकारच्या गादीचा/सोफ्याचा वापर केल्यास किंवा विशिष्ट आयुर्वेदिक औषधांचे सेवन केल्यास कोरोनापासून प्रादुर्भाव होणार नाही, असा चुकीचा दावा करुन दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा उत्पादकांवर आणि जाहिरातदारांवर व जाहिरात प्रक्रियेत भाग घेणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनामार्फत गुन्हा दाखल करून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दिला आहे.
कोणत्याही उत्पादकाने कोरोनावर औषधी उपाय असल्याचा दावा करणारी चुकीची जाहिरात केल्यास किंवा नागरिकांत संभ्रम निर्माण केल्याचे दिसून आल्यास अशा उत्पादक, जाहिरातदार व जाहिरात प्रक्रियेत भाग घेणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही डॉ.शिंगणे यांनी सांगितले आहे. कोरोनाबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे. यासाठी सर्व शासकीय कार्यालये, महामंडळे, स्वायत्त संस्था दिवसरात्र कार्यरत आहेत. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या जाहिरातीला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
कोरोना विषाणूसंदर्भात अफवा पसरविल्याप्रकरणी तसेच जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी येथील नारपोली पोलीस ठाणे येथे एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरिहंत मॅट्रेसेसचे मालकांनी दि. १३ मार्च रोजी एका गुजराती दैनिक वृत्तपत्रात ‘अरिहंत ॲन्टी कोरोना व्हायरस मॅट्रेस’ या मॅटरेसमुळे कोरोना विषाणूला प्रतिबंध होईल असे जनतेच्या मनामध्ये समजूत करून जनतेची दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध केली. तसेच त्याद्वारे त्यांनी कोरोना विषाणूला प्रतिबंध होईल असा खोटा दावा करुन जनतेमध्ये त्याबाबत अफवा पसरविली. या मालकाविरुद्ध नारपोली पोलीस ठाणे येथे गुरक्र १६६ भादवि कलम ५०५(२) सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५२ सह औषधीद्रव्य व जादुटोना (आक्षेपार्ह जाहीराती) अधिनियम १९५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबरोबर विशिष्ट आयुर्वेदिक औषधाचे सेवन केल्यास कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी रोग प्रतिरोधक औषधी अशा आशयाचा मजकूर असलेली आक्षेपार्ह मजकूर असलेली जाहिरात प्रकाशित करून वितरित केल्याबद्दल दि. १६ मार्च रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाने मुंबई येथील मुलुंड पोलीस स्टेशनला शितल आयुर्वेद भांडार प्रा. लि. या औषध उत्पादन व विक्री कंपनीवर गुन्हा औषधे व जादुटोणा (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या कायद्यांतर्गत सहा महिन्यांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्हीचीही तरतूद आहे.