Home बुलडाणा पत्रकारावरील भ्याड हल्ल्याने जिल्हा हादरला; वाळू माफियांविरोधात पत्रकारांचा एल्गार!

पत्रकारावरील भ्याड हल्ल्याने जिल्हा हादरला; वाळू माफियांविरोधात पत्रकारांचा एल्गार!

75

रवी अन्ना जाधव

देऊळगाव राजा:-लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांवर हल्ले करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाळू माफियांनी आता मजल-दरमजल करत थेट मारहाण करण्यापर्यंत मजल मारली आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील राहारी येथील वाळू घाटावर वार्तांकन करण्यासाठी गेलेले पत्रकार *रामदास मानसिंग कहाळे* (रा. आडगाव राजा) यांना वाळू वाहतूकदार कंत्राटदाराने त्याच्या साथीदारांसह बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना १९ मे रोजी घडली. या घटनेचा ‘मातृतीर्थ बहुउद्देशीय पत्रकार मंडळा’ने तीव्र निषेध केला असून प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार रामदास कहाळे हे सिंदखेड राजा तालुक्यातील राहारी येथील वाळू घाटावर सुरू असलेल्या घडामोडींचे वार्तांकन करण्यासाठी गेले होते. बातम्या का लावता? याचा राग मनात धरून तेथील वाळू कंत्राटदाराने जमाव जमवून कहाळे यांना घेरले आणि त्यांना जबर मारहाण केली. ही मारहाण केवळ एका व्यक्तीवर नसून पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर केलेला हल्ला असल्याची भावना पत्रकार वर्तुळातून उमटत आहे.
उफराटा न्याय: पीडित पत्रकारावरच गुन्हा दाखल!
धक्कादायक बाब म्हणजे, मारहाण करणाऱ्या वाळू माफियांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि पत्रकारावर दबाव आणण्यासाठी किनगाव राजा पोलीस ठाण्यात रामदास कहाळे यांच्या विरोधातच तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे. “चोर सोडून संन्याशाला फाशी” या म्हणीप्रमाणे हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
*पत्रकार मंडळाची आक्रमक भूमिका*
​​या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन **’मातृतीर्थ बहुउद्देशीय पत्रकार मंडळा’**ने आज माननीय तहसीलदार साहेब, देऊळगाव राजा यांना निवेदन दिले. या निवेदनात खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:
​पत्रकार रामदास कहाळे यांना मारहाण करणाऱ्या आरोपींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करावी.
​पत्रकारावर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत.
​पत्रकारांना संरक्षण मिळावे आणि माफियांच्या मुजोरीला चाप लावावा.
​या निवेदनावर अध्यक्ष ओमप्रकाश पन्हाड, सुषमा राऊत, प्रशांत पंडित, प्रकाश साकला यांच्यासह रंजीत खिलारे, जुनेद कुरेशी, अंबादास बुरकुल, रवि आण्णा जाधव, शब्बीर पठाण आणि अन्य २० हून अधिक पदाधिकारी व पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
​”पत्रकारांवर दबाव आणून सत्याचा आवाज कोणीही दाबू शकत नाही. जर दोषींवर कारवाई झाली नाही आणि खोटे गुन्हे मागे घेतले नाहीत, तर संपूर्ण जिल्ह्यातील पत्रकार रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील.