Home बुलडाणा मेहकरात विधवा महिलांचा ऐतिहासिक पुनर्विवाह सोहळा…!

मेहकरात विधवा महिलांचा ऐतिहासिक पुनर्विवाह सोहळा…!

54

दैनिक बातमी जगत’ परिवाराने व्यक्त केले प्रा. डी. एस. लहाने यांचे ऋण..

मेहकर प्रतिनिधी

समाजातील जुनाट रूढी-परंपरा आणि संकुचित मानसिकतेला छेद देत, एकल महिलांना सन्मानाचे नवजीवन मिळवून देणारा एक क्रांतिकारी सामूहिक पुनर्विवाह सोहळा मेहकर येथे नुकताच उत्साहात झाला. या सोहळ्यात दहा जोडप्यांनी भावी संसाराची रेशीमगाठ बांधली.या कार्यक्रमाचे संकल्पक प्रा डी. एस.लहाने सर यांनी हाती घेतलेले सामाजिक काम हिमालयाच्या उंचीचे कार्य असल्याचे जेस्ट नेते श्यामबाबू उमाळकर
म्हणाले.यावेळी दैनिक बातमी जगत परिवाराचे वतीने संपादक कैलास राऊत यांनी प्रा. डी एस लहाने यांचा सन्मान केला.

‘मानस फाउंडेशन, सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्ट (मुंबई) आणि कृषीवैभव लॉन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात १० परित्यक्ता, विधवा व घटस्फोटीत महिलांनी नव्या आयुष्याची सुंदर सुरुवात केली.

रविवारी, १७ मे २०२६ रोजी येथील हॉटेल केव्ही प्राईड (कृषीवैभव लॉन) येथे दुपारी ११ वाजता हा सोहळा पार पडला. तत्पूर्वी, संपूर्ण मेहकर शहरातून भल्या मोठ्या वाहनांमधून या १० जोडप्यांची भव्य वरात काढण्यात आली, जी शहरात कौतुकाचा आणि परिवर्तनाचा मुख्य केंद्रबिंदू ठरली. त्यानंतर अत्यंत पुरोगामी अशा ‘सत्यशोधक’ पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच विवाह इच्छुक तरुण-तरुणींचा परिचय मेळावाही घेण्यात आला.

हिमालयाच्या उंचीचे सामाजिक कार्य: श्यामबाबू उमाळकर या सोहळ्याचे प्रास्ताविक मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डी. एस. लहाने यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्यामबाबू उमाळकर म्हणाले, “प्रा. लहाने सरांचे हे कार्य हिमालयाच्या उंचीचे असून, राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाज परिवर्तनाचा हा सर्वोच्च केंद्रबिंदू आहे. या कार्याने समाजात आमूलाग्र आणि सकारात्मक बदल निश्चितपणे दिसून येईल.” भविष्यात मेहकरकरांच्या वतीने फाउंडेशनला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
या ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधून समाजात सकारात्मक क्रांती घडवून आणणारे ‘मानस फाउंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डी. एस. लहाने सर यांचा दैनिक बातमी जगत’परिवाराच्या वतीने सहपरिवार विशेष सत्कार करण्यात आला.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री. शैलेशभाऊ सावजी आणि माजी सभापती सौ. सायलीताई सावजी या दांपत्याने आपल्या घरचेच कार्य असल्यासारखे संपूर्ण यंत्रणेसह मनापासून परिश्रम घेतले. त्यांच्या या आपुलकीमुळे सोहळ्याला एक भव्य आणि कौटुंबिक स्वरूप प्राप्त झाले. या कौतुकास्पद कार्यासाठी आमदार श्री. सिद्धार्थ खरात, नगराध्यक्ष श्री. किशोर गारोळे आणि नगरसेवक श्री. महेश रिंढे यांनी आयोजकांना शुभेच्छा देत, पीडितांना आधार देणे हाच खरा समाजधर्म असल्याची भावना व्यक्त केली.
या सामाजिक आंदोलनाला बळ देण्यासाठी आमदार सिद्धार्थ खरात, ज्येष्ठ नेते श्यामबाबू उमाळकर, नगराध्यक्ष किशोर गारोळे, ठाणेदार व्यंकटेश आलेवार, नगरसेवक महेश रिंढे, प्रसिद्ध समाजसेविका शाहीनाताई पठाण, प्रतिभाताई भुतेकर, जोशी ताई, फुलेकर ताई, डोणगावचे सरपंच चरण आखाडे, उत्कर्ष अर्बनचे पदाधिकारी आणि मानस फाउंडेशनचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नवविवाहित १० जोडप्यांना सुखी व समृद्ध वैवाहिक जीवनाचे आशीर्वाद दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महत्रे यांनी केले . तर महेश दादा रिंढे यांनी आभार मानले.