Home यवतमाळ वडकी पोलिसांची मोठी कारवाई : २५ गोवंशांची सुटका, ६ मृत बैलांसह आयशर...

वडकी पोलिसांची मोठी कारवाई : २५ गोवंशांची सुटका, ६ मृत बैलांसह आयशर वाहन जप्त; चालक फरार

66

वडकी | प्रतिनिधी

राळेगावकडून वडकीकडे अवैधरित्या गोवंश वाहतूक करणाऱ्या आयशर वाहनावर वडकी पोलिसांनी पहाटेच्या सुमारास धाडसी कारवाई करत तब्बल २५ गोवंशांची सुटका केली. यामध्ये ६ बैल मृत अवस्थेत, तर १९ गोवंश जिवंत आढळून आले. या प्रकरणी सुमारे ₹23.80 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाहन चालक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १८ मे २०२६ रोजी पहाटे ३.४५ वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन राळेगाव येथून माहिती मिळाली की, गोवंश भरून नेणारे एक आयशर वाहन राळेगावकडून वडकीच्या दिशेने येत आहे. माहिती मिळताच वडकी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ सतर्क झाले.

वडकी हद्दीतील उमरेड टोल नाक्यावर अवजड वाहनाच्या सहाय्याने रस्ता बंद करण्यात आला. मात्र संशयित वाहनाने टोलमार्ग टाळत खेडेगाव मार्गे रिधोरा गावाकडून विहीरगावच्या दिशेने मार्ग बदलला. यानंतर वडकी पोलिसांनी जलद हालचाल करत विहीरगाव चौफुलीवर रस्ता अडविला, तर राळेगाव पोलीस मागून पाठलाग करत होते.

दरम्यान, गोवंश घेऊन जाणाऱ्या आयशर वाहन क्रमांक MH-40/BG-8744 च्या चालकाने वाहन रस्त्यातच उभे करून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले.

पोलीसांनी वाहनाची तपासणी केली असता, त्यात २५ गोवंश (बैल) आढळून आले. यापैकी ६ बैल मृत, तर १९ जनावरे जिवंत अवस्थेत होती. जिवंत जनावरांची किंमत अंदाजे ₹३.८० लाख, तर आयशर वाहनाची किंमत ₹२० लाख असल्याने एकूण ₹२३.८० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जखमी व जिवंत गोवंशांना तात्काळ प्राथमिक पशुवैद्यकीय उपचार करून गोवंशाळेत दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध कलम 325 बीएनएस, तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमातील कलम 5, 5(B), 53 आणि प्राण्यांवरील क्रूरतेस प्रतिबंध अधिनियम कलम 11 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री चिंता, अपर पोलीस अधीक्षक श्री थोरात, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री बंसल यांच्या मार्गदर्शनाखाली वडकी ठाणेदार सुखदेव भोरकडे, पो.हवा. निलेश वाढई, पो.कॉ. सुरेश नगराळे, चालक दीपक मडकाम, तसेच राळेगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश दंदे व इतर कर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या केली. प्रकरणाचा पुढील तपास वडकी पोलीस स्टेशन करीत आहे.

Previous articleपोलीस बॉईज असोसिएशनच्या आंदोलनाला आणखीन एक मोठे यश…!
editor
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.