Home मराठवाडा आत्महत्या केलेल्या त्या शेतकऱ्यांच्या पत्नींनी दिली दहावीची परिक्षा

आत्महत्या केलेल्या त्या शेतकऱ्यांच्या पत्नींनी दिली दहावीची परिक्षा

134

नांदेड ; दि.४ – ( राजेश भांगे) –
अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : शिक्षण ही निरंतर चालनारी प्रक्रिया आहे. शिक्षणाला वयाची अडचणी कधीच येत नाही. माणूस शेवटच्या श्‍वासापर्यंत विद्यार्थी असतो. शेतकरी कुटुंबाला दररोज नवनव्या परिक्षेला सामोरे जावे लागते. कधी परिक्षा निसर्ग घेतो तर कधी परिस्थिती. जीवनातील प्रत्येक परिक्षेचा पेपर धैर्याने सोडणारा शेतकरी परिस्थितीला कधी शरण जातो. आशा आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या पत्नींने आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर आपण ही शिक्षणाच्या प्रवाहात येण्याचा निर्धार केला. नव्या उमेदीने दहावीची परीक्षा देत आहेत.
ही परिक्षा देत असतांना त्यांच्या जुन्या शैक्षणिक जीवाला उजाळा मिळाला असून नवी दिशा, नवी आशा व उमेद निर्माण झाली आहे.या सकारात्मक घटनेमुळे नांदेड जिल्हातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटूंबाला एक चांगला संदेश गेल्याची भावना आहे. तर परिक्षा देणा-या शेतकरी महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव होत असून जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी या महिलेचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
दहावीची परीक्षा शालेय जीवनांत महत्त्वाची मानली जाते. पुढील शिक्षणाची वाटचाल व कलाटणी दहावीची परीक्षा देत असते. पण ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण अर्धवट होते. लग्न लवकर झाल्याने पुढील शिक्षण नाईलाजाने थांबवावे लागते. घरच्या कर्त्यां पुरूषाने आत्महत्या केल्यावर त्या शेतकरी कुटूंबात अडचणींची मालिका सुरू होते. अशा अडचणीला दोन हात करणारे शेतकरी कुटूंब अर्धापूर तालुक्यात आहेत.
पुण्यातील भोई फाऊंडेशनने अर्धापूर तालुक्यात पुण्यजागर प्रकल्प सुरु केला आसून शेतकरी कुटूंबातील पाल्यांना शैक्षणिक मदत करण्यात येत आहे. मुलांच्या शिक्षणासोबत त्यांच्या पालकांचे ही शिक्षण व्हावे यासाठी पुढाकार घेतला. अर्धापूर तालुक्यातील धामदरी येथील सुनिता कदम, मालेगाव येथील मंगला इंगोले व अर्धापूर येथील लक्ष्मी साखरे यांनी बहिस्थ विद्यार्थनी म्हणून दहावीच्या परिक्षेचा अर्धापूर येथे अर्ज भरला. त्यानी अर्धापूर येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेतील दहावी परिक्षा केंद्रातून परिक्षा दिली. त्यामुळे नवी उमेद नवी आशा निर्माण झाली आहे.
पुण्यजागर प्रकल्पाचे डॉ मिलिंद भोई, अनिल गुंजाळ, जिल्हा समन्वयक लक्ष्मीकांत मुळे, गुणवंत विरकर, मुख्याध्यापक डाॅ. शेख, रमेश करंजीकर, नागोराव भांगे, छगन इंगळे, सय्यद युनुस, प्रदिप हिवराळे , सय्यद जाकेर, जमील आहेमद यांनी शुभेच्छा दिल्या.
आमच्या कुटूंबातील कर्त्यांनी आत्महत्या केल्यामुळे आमच्या कुटूंबावर खुप मोठे संकट आले होते. या संकटातून सावरताना आम्हाला भोई प्रतिष्ठाणाने खूप मोठे सहकार्य केले आहे. आमच्या पाल्यांना शैक्षणिक मदत देण्यात येत आहे. पाल्यांसोबत आपणही शैक्षणिक प्रवाहात यावे हा ठाम निर्धार केला. दहावीची परीक्षा देतांना आम्हाला आमच्या शालेय जीवनाची आठवण झाली. जीवनातील अनेक परिक्षेत उत्तीर्ण खडतर प्रयत्न करावे लागले आहेत. आता आम्ही दहावीची परीक्षा दिली आहे. आशा भावना मंगला इंगोले, सुनिता कदम व लक्ष्मी साखरे यांनी व्यक्त केल्या. तरी यावेळी
या तिघींनी दिली परिक्षा.
खासगीरित्या परिक्षा देण्यासाठी १७ क्रमांकाचा अर्ज भरावा लागतो. जिल्हा परिषदच्या मागच्या चार दशकांच्या इतिहासात आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या पत्नीने परिक्षा देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या शेतकरी महिलांनी परिक्षा दिल्याने इतर महिला, मुलींना प्रेरणा मिळणार आहे अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापक डाॅ. शेख यांनी दिली.
अर्धापूर तालुक्यात पुण्यातील भोई प्रतिष्ठाणाच्या पुढाकारातून आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटंबातील पाल्यासांठी पुण्यजागर प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी कुटूंबातील पाल्यांना शैक्षणिक मदत दिली जाते. आत्माहात्या केलेल्या शेतकरी कुटंबातील महिला खच्चून न जाता जीवनातील अडचणीला धैर्याने समोर जात असून तीन शेतकरी महिलांनी दहावीची परिक्षा दिली आहे. ही एक सकारात्मक घटना असून शेतकरी कुटूंबाला प्रोत्साहन देणारी आहे.