Home वाशिम मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलीस अधीक्षकांसह सायबर पोलीस पथकाचा सत्कार करत मानले...

मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलीस अधीक्षकांसह सायबर पोलीस पथकाचा सत्कार करत मानले आभार ; ०३.५५ लाखांचे ५० मोबाईल मूळ मालकांना परत

64

फुलचंद भगत

वाशिम:-सध्याच्या इंटरनेट युगामध्ये जीवनातील दैनंदिन सर्व व्यवहार ऑनलाईन पद्धतीने मोबाईलच्या माध्यमातून होतात. त्यामुळे मोबाईल फोन हा जीवनाचा अत्यावश्यक भाग बनत चालला आहे. मात्र हाच मोबाईल फोन हरविल्यास किंवा चोरी झाल्यास मात्र आपली तारांबळ उडते. परंतु आपला हरविलेला/गहाळ झालेला मोबाईल शोधणे आता CEIR पोर्टलद्वारे सोपे झाले आहे.

केंद्र शासनाच्या CEIR वेबपोर्टलवर हरविलेल्या मोबाईलचा शोध घेणे सोयीचे झाले असून नागरिकांनी त्यांचा मोबाईल फोन हरविल्यास/चोरी झाल्यास तत्काळ www.ceir.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली तक्रार नोंदवावी. तसेच सायबर पोलीस स्टेशन येथे जाऊन आपल्या मोबाईलची तक्रार नोंदवावी. अशाचप्रकारे वाशिम जिल्ह्यातील हरविलेले/गहाळ झालेले एकूण ५० मोबाईल CEIR पोर्टलद्वारे शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. वाशिम घटकातील हरविलेले/गहाळ झालेले एकूण ५० मोबाईल संच अंदाजे किंमत ०३.५५ लाख रुपये दि.०७.०२.२०२४ रोजी मा.पोलीस अधीक्षक श्री.अनुज तारे (IPS) यांचेहस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. मागील वर्षी एकूण हरविलेले/गहाळ झालेले एकूण ३५८ मोबाईल संच त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले होते. तक्रारदारांना त्यांचे हरविलेले/गहाळ झालेले मोबाईल संच परत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते व त्यांनी उत्स्फुर्तपणे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मा.पोलीस अधीक्षक श्री.अनुज तारे (IPS) यांचे व सायबर पोलीस स्टेशन, वाशिम येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे आभार मानले.

सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.अनुज तारे (IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम श्री.सुनीलकुमार पुजारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगरूळपीर श्रीमती नीलिमा आरज यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.प्रमोद इंगळे, व पोलीस अंमलदार विजय गंगावणे, वैभव गाढवे, सागर वाढोणकर, पुष्पा मनवर सर्व नेमणूक पो.स्टे.सायबर, वाशिम यांनी पार पाडली. नागरिकांनी त्यांचा मोबाईल फोन हरविल्यास/चोरी गेल्यास CEIR पोर्टलवर तक्रार दाखल करावी व सायबर पोलीस स्टेशन, वाशिम येथे भेट द्यावी, असे आवाहन वाशिम पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.