Home विदर्भ अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम* *विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२३ : निकाल

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम* *विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२३ : निकाल

76

वर्धा – ज्या देशात बहुतांश जनतेचे उदरनिर्वाहाचे आणि उपजीविकेचे साधन शेती हेच आहे, त्याच देशात सर्वात जास्त उपेक्षा शेतीचीच व्हावी, हा दुर्दैवविलास आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि तत्सम क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही शेती क्षेत्राची पीछेहाट व्हावी, हे सुद्धा अनाकलनीयच आहे. शेतकरी गरीब आहे आणि ज्याच्याकडे आर्थिक सबळता नाही त्याची कुणीही दखल घेत नाही, कदाचित असाच याचा अर्थ आहे.

पण; आता शेतकर्‍यांच्या मदतीला नवीन संगणकीय व आंतरजालिय तंत्रज्ञान धावून आलेलं आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अल्पशा खर्चात शेतीविषयाला आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त होण्याची आणि भारतीय शेतीला वैश्विक साहित्यक्षेत्रात दृगोचर करण्याची जगाच्या उत्क्रांतीच्या इतिहासात पहिल्यांदाच संधी निर्माण झाली आहे. या दृष्टिकोनातून बघितले तर शेतीक्षेत्र ऐतिहासिक वळणावर उभे आहे आणि नेमकी हीच संधी हेरून आम्ही आंतरजालाला विधायक व रचनात्मक कार्यासाठी वापरून घ्यायचे ठरविले आहे. त्याचीच प्रारंभिक पायरी म्हणून अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ यांच्यावतिने मागील १० वर्षापासून विश्वस्तरीय लेखनस्पर्धा यशस्वीरित्या आयोजित केली जात आहे. विश्वस्तरीय लेखनस्पर्धेचे यंदाचे हे दहावे वर्ष.

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम म्हणून ०३ सप्टेंबर ते १९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत बळीराजा डॉट कॉम (www.baliraja.com ) या संकेतस्थळावर विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२३ जाहिर करून यशस्वीरित्या पार पाडली होती. सर्व प्रवेशिका https://baliraja.com/spardha-2023 येथे उपलब्ध आहेत. या स्पर्धेचा निकाल जाहीर करतांना अत्यंत आनंद होत आहे.

शेतीशी निगडीत विषय साहित्यामध्ये हाताळणार्‍यांची संख्याच उणीपुरी असल्याने आणि लेखनाचा विषय “शेतकऱ्यांचा राजा बळीराजा” असा जटिल असल्याने या स्पर्धेला कितपत प्रतिसाद मिळेल या विषयीची धाकधूक मनात होतीच. परंतु यंदा उदंड प्रतिसाद मिळाला आणि देशविदेशातून मराठी भाषिकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला, ही बाब खचितच आनंद देणारी ठरली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिक्षक मंडळाने परिश्रम घेऊन ही स्पर्धा यशस्वी करून दाखविली, त्याबद्दल अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ त्यांची अत्यंत ऋणी आहे.

स्पर्धा परीक्षणासाठी लेखनस्पर्धा परिक्षक म्हणून मा. प्रा. डॉ. ज्ञानदेव राऊत (लातूर), मा. विवेक पटाईत (दिल्ली), मा. विनोद इंगोले (अकोला), मा. डॉ. सुरेश मोहितकर (चंद्रपूर), मा. डॉ. मीना सोसे (बुलढाणा), मा. डॉ. सिद्धार्थ तायडे (बीड), मा. शालिनी वाघ (अहमदनगर), मा. मीना नलवार (नांदेड), मा. ज्ञानेश उगले (नाशिक), मा. प्रवीण आडेकर (चंद्रपूर) यांचा परीक्षक मंडळात समावेश होता.

*विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२३ : निकाल*
लेखनाचा विषय : शेतकऱ्यांचा राजा बळीराजा

अनु. – लेखनविभाग – विजेता क्रमांक- लेखक/कवी – जिल्हा – लेखाचे/कवितेचे शीर्षक

1 कथा – प्रथम – रावसाहेब जाधव – नाशिक – तिचं परगती पत्रक
2 गझल – प्रथम – गंगाधर मुटे – वर्धा – आत्महत्या बळीच्या तू रोख वामना
3 गझल – द्वितीय – चंद्रकांत कदम – नांदेड – एल्गार
4 गेय रचना – प्रथम – रंगनाथ तालवटकर – वर्धा – अश्रूंच्या बांधावरती
5 गेय रचना – द्वितीय – सुनिल बावणे – चंद्रपूर – एकदासं तू मरणं देगा
6 छंदमुक्त कविता – प्रथम – नरेंद्र गंधारे – वर्धा – बळीराजा : “तेव्हा आणि आता सुद्धा”
7 छंदमुक्त कविता – द्वितीय – खुशाल गुल्हाने – अमरावती – आत्महत्या
8 छंदमुक्त कविता – तृतीय – राजेश अंगाईतकर – यवतमाळ – पुन्हा जन्म घे बळीराजा
9 छंदोबद्ध कविता – प्रथम – सुरेखा बोरकर – नागपूर – दानशूर बळीराजा
10 छंदोबद्ध कविता – द्वितीय – विनायक अंगाईतकर – अमरावती – कोणे एकेकाळी
11 पद्यकविता – प्रथम – प्रशांत झिलपे – वर्धा – बळीचे वचन (अभंग)
12 पद्यकविता – द्वितीय – यशवंत पुलाटे – अहमदनगर – बळीनामा…
13 पुस्तक समीक्षण – प्रथम – अजित सपकाळ – अकोला – पुस्तक समीक्षण : बळीवंश
14 ललितलेख – प्रथम – कृष्णा जावळे – बुलडाणा – कष्टकरी जनतेचा राजा बळीराजा
15 ललितलेख – द्वितीय – भारती सावंत – नवी मुंबई – अन्नदात्या संस्कृतीचा महानायक : बळीराजा
16 वैचारिक लेख – प्रथम – दिलीप भोयर – अमरावती – बळी बळीराजाचा
17 वैचारिक लेख – द्वितीय – सतीश मानकर – वर्धा – बळी असेच कितीदा स्वतःला गाडून घेणार?
18 वैचारिक लेख – तृतीय – अनुराधा धामोडे – पालघर – अवघ्या जगाचा अन्नदाता
19 शोधनिबंध – प्रथम – प्रज्ञा बापट यवतमाळ – आधुनिक वामन आणि आधुनिक बळीराजा
20 शोधनिबंध – द्वितीय – रविंद्र गोरे – अहमदनगर – बळीचे कर्तुत्व झाकले गेले

स्पर्धेत सहभाग नोंदवणार्‍या सर्व सहकारी लेखक कवी आणि विजेत्यांचे कार्याध्यक्ष श्री. गंगाधर मुटे यांनी अभिनंदन केले असून ४ आणि ५ मार्च २०२४ ला नियोजित नाशिक येथील ११ व्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल. स्पर्धकाला स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत हजर राहून पारितोषिक स्वीकारता येईल, असे स्पर्धा संयोजक श्री. राजेंद्र फंड, डॉ. मनीषा रिठे, श्री.रविंद्र दळवी, श्री. केशव कुकडे, श्री. गंगाधर मुटे यांनी कळविले आहे.