राजेश भांगे
नांदेड जिल्ह्यातील वीरपत्नी शीतल कदम गेल्या वर्षभरापासून लेकीच्या शिक्षणासाठी शाळांमध्ये प्रवेशासाठी धडपड करत आहेत.
नांदेड , दि. २९ :- लेकीला चांगल्या शाळेत शिक्षण मिळावं ती मोठी अधिकारी बनावी असं स्वप्न बाळगणाऱ्या शहीद जवानाच्या वीरपत्नीला अनेक शाळांचे उंबरठे झिजवूनही निराशा पदरी पडली आहे. त्यामुळे पती देशासाठी विनाकारण शहीद झाले. त्यांचे बलिदान व्यर्थ गेले अशी खंत शहीद जवान संभाजी कदम यांच्या वीरपत्नी शीतल कदम यांनी व्यक्त केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील वीरपत्नी शीतल कदम गेल्या वर्षभरापासून लेकीच्या शिक्षणासाठी शाळांमध्ये प्रवेशासाठी धडपड करत आहेत. अनेक शाळांचे उंबरठे झिजवूनही लेकीला शाळेत प्रवेश मिळत नाही. वर्षभरापासून शाळेच्या प्रवेशासाठी प्रयत्न करुनही यश मिळालं नाही. त्यामुळे वीरपत्नी यांनी सांगितले की, जिथे आम्ही गेलो तिथं आम्हाला साधी विचारपूसही केली जात नव्हती. अनेक पत्र घेऊन गेले तरीही उत्तर मिळालं- ‘अशी पत्र खूप येतात’! याचा फरक पडत नाही, अशी उत्तरं शाळांकडून ऐकायला मिळाली.
संभाजी कदम नांदेड जिल्ह्यातील जानापुरी गावचे शहीद जवान आहेत. जम्मू काश्मीरमध्ये नोव्हेंबर २०१६ रोजी ते शहीद झाले होते. संभाजी कदम यांच्या अत्यंविधीवेळी याच जिल्ह्यातील नव्हे तर आजुबाजुच्या जिल्ह्यातील हजारो लोक दर्शनासाठी आले होते. संभाजी कदम यांना तेजस्विनी नावाची मुलगी आहे तिचं वय ६-७ वर्ष आहे. वीरपत्नी शीतल कदम यांना आपल्या लेकीला चांगलं शिक्षण देऊन मोठं अधिकारी बनविण्याचं स्वप्न आहे. त्यासाठी चांगल्या शाळेत तिला प्रवेश मिळावा यासाठी त्या प्रयत्न करत आहेत.
नांदेडमध्ये प्रसिद्ध ज्ञानमाता विद्याविहार ही नावाजलेली इंग्रजी माध्यमातील शाळा आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात शीतल कदम या शाळेत मुलीच्या प्रवेशासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना सांगण्यात आलं की, यंदा प्रवेश होऊ शकत नाही तुम्ही जानेवारी महिन्यात या, या महिन्यात शीतल कदम पुन्हा शाळेत गेल्या पण त्यांना दाद दिली नाही. त्यामुळे वीरपत्नीने जिल्हा सैनिक कार्यालयाकडून शिफारस घेऊन शिक्षण अधिकाऱ्यांना भेट दिली. शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळेसाठी पत्र दिलं त्यात लिहिलं होतं की, शीतल कदम या शहीद जवानाच्या वीरपत्नी आहे. त्यामुळे जवानाच्या मुलीला विनाशुल्क शाळेत प्रवेश देण्यात यावा. तरीही शाळेच्या प्रशासनाने या पत्राची दखल घेतली नाही. शाळेचे डोनेशन भरण्यासही तयार आहे असंही सांगितलं. वीरपत्नीला शाळेच्या संचालकांना भेटू दिलं नाही. साधी विचारपूसही केली नाही. बसण्यासाठी जागा दिली नाही पिण्यासाठी पाणी दिलं नाही अशी अपमानास्पद वागणूक दिल्याचा वीरपत्नीचा आरोप आहे.
वीरपत्नीने सांगितलं की मी शहीद जवानाची पत्नी आहे. तरीही त्याची दखल घेतली नाही. ‘तुम्ही चालते व्हा!’ असं सांगण्यात आलं. त्यामुळे हताश झालेल्या वीरपत्नीने माध्यमाशी बोलताना माझे पती विनाकारण देशासाठी शहीद झाले. ते असते तर आम्ही कसंबसं जगलो असतो. त्यांचे बलिदान व्यर्थ गेले अशी निराशादायक प्रतिक्रिया दिली. त्यामुळे या प्रकरणावर राज्याचे शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री दखल घेऊन वीरपत्नीला न्याय मिळवून देतील का? या मुजोर शाळेवर कारवाई करणार का? हे पाहणं गरजेचे आहे.